|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातील 22 लाख 92 हजार जनमताचा कौल कोणाला याचा आज फैसला

जिह्यातील 22 लाख 92 हजार जनमताचा कौल कोणाला याचा आज फैसला 

शिवाजी भोसले/ सोलापूर

सोलापूर जिह्याच्या इतिहासातच पहिल्यांदा अत्यंत वेगळ्या वळणावर आणि कमालीच्या चुरशीने झालेल्या ‘फाईट टू फाईट’ सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे सोलापूर मतदारसंघातील 10 लाख 88 हजार 386 तर माढा लोकसभेमधील 12 लाख 11 हजार 48 अशा एकूण 22 लाख 92 हजार 434 इतक्या मतदारांच्या जनमताचा कौल कोणाला मिळाला हे समजण्याची घटीका आता काही तासांवर आली आहे. सोलापूर आणि माढय़ाचा खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेवर कोणी झेंडा रोवायचा याचा निर्णय मतदारांनी घेतला असून आपला खासदार म्हणून नेमकी कोणाला संधी दिली हे आज मध्यरात्रीनंतर समजणार आहे.

विशेष म्हणजे गेली 35 ते 40 वर्ष सोलापूरचे सुपूत्र म्हणून महाराष्ट्र तसेच देशाच्या तख्तावर सोलापूरचा झेंडा रोवणाऱया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाच मतदारांनी पुन्हा संधी दिली की, भारतीय राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर हे काहीतरी वंचितांसाठी भरीव काम करतील म्हणून त्यांना पाठिंबा दिला की, लिंगायत समाजामध्ये धर्मगुरु म्हणून अधिष्ठान असलेल्या तसेच उच्चशिक्षीत आणि निस्पृह चेहरा म्हणून गौडगावचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना आपला खासदार म्हणून संसदेत पाठविण्यासाठी त्यांना मतांची दक्षिणा दिली हे शुक्रवारच्या पहाटे कळणार आहे. त्याबद्दलचे औत्सुक्य केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि अकलूजच्या मोहिते-पाटील परिवाराने ताकद लावलेल्या माढा मतदारसंघात एकूण 12 लाख 11 हजार 48 मतदारांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या पाठिशी ताकद लावली की, या मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना संसदेत आपला खासदार म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. याबद्दलचा मतदारांनी केलेला फैसला देखील आज मध्यरात्रीनंतर कळणार आहे.

   सोलापूर लोकसभा मतदारसंघात अत्यंत वेगळ्या वळणावर या खेपेची लोकसभेची निवडणूक गेली होती. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरच्या मैदानावर उतरुन निवडणूक लढविल्याने सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत भर पडली होती. त्याचबरोबर भाजपाने लिंगायत समाजाच्या वोट बँकेवर डोळा ठेऊन डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना रिंगणात उतरविले. त्यामुळे पहिल्यांदाच अत्यंत चुरशीने या मतदारसंघात शेकडा 58.45 टक्के एवढे मतदान झाले आहे.

गेली 40 वर्षे सोलापूरचे नेतृत्व करणाऱया सुशीलकुमार शिंदे यांची या खेपेस चांगलीच दमछाक झाली आहे. तरीही त्यांनी मोठय़ा जिद्दीने ही निवडणूक लढविली आहे. आपली ही शेवटचीच निवडणूक अशी भिष्मप्रतिज्ञा केलेल्या सुशीलकुमारांना मतदारांनी शेवटची संधी दिली का याबद्दलचे मोठे औत्सुक्य आहे. तसेच देशाचा काँग्रेसचा राष्ट्रीय नेता म्हणून सुशीलकुमारांच्या बाबतीत जनमताने काय कौल दिला हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

   राज्यात सोशल इंजिनिरिंगचा प्रयोग करण्यासाठी महाराष्ट्रातील तब्बल 48 लोकसभेच्या जागांवर उमेदवार देण्यासाठी स्वतः आपले होमपीच अकोला आणि सोलापुरात लोकसभेच्या आखाडय़ात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासंबंधीदेखील मोठे औत्सुक्य आहे. सोशल इंजिनिरिंगचा प्रयोग करताना ते सुशीलकुमार आणि शिवाचार्य महास्वामी यांच्याशी टक्कर देऊन निवडून येतात का वंचित आघाडीच्या झेंडय़ाखाली आलेल्या समाजातील बारा बलुतेदारांनी आपले नेते म्हणून त्यांना निवडले का याचा फैसलादेखील आज होतो आहे.

 लोकसभेच्या ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाला चकवा देऊन बारामतीकरांची रसद घेत माढय़ाच्या आखाडय़ात उतरलेल्या संजय शिंदे यांच्या विजयासंबंधी काय होणार, याबद्दलदेखील मोठी उत्सुकता आहे. भाजपासोबत घेतलेला पंगा, समविचारी मित्रांची सोडलेली साथ केवळ शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांच्या पायावर डोके ठेऊन निवडणूक लढलेल्या शिंदेंच्याबाबतीत मतदारांनी काय निर्णय घेतला? त्याचबरोबर भाजपाची पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचा परिवार यांची ताकद घेण्यासह आपल्या सातारा जिह्यातील माण आणि खटाव तालुक्यातील आपल्या वर्चस्वाच्या जोरावर माढय़ाच्या आखाडय़ात शड्डू ठोकलेल्या नाईक-निंबाळकरांना जनमताचा कौल कितपत राहिला हेदेखील आजच मध्यरात्रीनंतर समजेल.