|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तीर्थक्षेत्र आराखडा अंमलबजावणीसाठी शिवसेनेचा रास्तारोको

तीर्थक्षेत्र आराखडा अंमलबजावणीसाठी शिवसेनेचा रास्तारोको 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रखडत चाललेल्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा, अशी मागणी घेऊन शहर शिवसेनेच्यावतीने अंबाबाई मंदिरासमोरील महाद्वार चौकात मंगळवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे बिनखांबी गणेश मंदिर व ताराबाई रोडमार्गे चौकात येऊन पापाची तिकटीकडे जाणारी वाहतूक पाऊण तास ठप्प झाली. यावेळी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचे काम नेटाने पूर्ण झालेच पाहिजे, अशी सातत्याने घोषणा देऊन चौक परिसर दणाणून सोडला.

  तिर्थक्षेत्र आराखडा अंमलबजावणीच्या मुद्यावरुन शिवसेना शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शंभरावर पदाधिकारी व कार्यकर्ते रास्ता-रोको करण्यासाठी महाद्वार चौकात जमले. प्रारंभी आराखडय़ासंदर्भातील घोषणाबाजी करत वाहतूक रोखून धरली. वाहतुक ठप्पच झाल्यामुळे महाद्वार रोड व ताराबाई रोडवरील दुकानांमधील व्यवहारही थांबले.

  रविकिरण इंगवले म्हणाले, महोत्सवात स्वतः ला आडकवून घेतलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीर्थक्षेत्र आराखडय़ाबाबत भाविकांची बोळवण करत आहेत. इतर विकासकामांबाबतही निव्वळ घोषणाबाजीचा पाऊस पाडत राहणे ऐवढेच त्यांना माहित आहे. निदान अंबाबाईच्या नावाने तरी शहरवासियांची फसवणूक करण्याचा प्रकार पालकमंत्र्यांनी करु नये, अशी लोकभावना आहे. केवळ राजकारण व महोत्सव करत बसल्यामुळेच आखाडय़ाची अंमलबजावणी थांबली आहे. भविष्यातही त्यांनी जर अंमलबजावणीस टाळाटाळ केल्यास त्यांच्या घरासमोर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. सध्या देवस्थान समितीकडून भाविकांनी दिलेल्या पैशाची लुट सुरु असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी याकडे गांभिर्याने पाहून लुटीचा प्रकार न थांबविल्यास त्यांनाही अंबाबाई मंदिरात जाण्यापासून रोखून धरु, असा इशाराही इंगवले यांनी दिला.

  दरम्यान, रास्ता-रोकोची माहिती कळताच महापालिकेचे प्रकल्प अधिकारी अरुण गवळी महाद्वार चौकात आले. त्यांनी लोकसभा निवडणूकीची 23 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर लवकरात लवकर विकासकामांना सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही दिली. इंगवले यांनी गवळी यांना आराखडय़ासंदर्भातील निवेदन देऊन रास्ता-रोको आंदोलन मागे घेतले.

 आंदोलनात शिवसेना उपशहर प्रमुख जयवंत हारुगले, राजीव पाटील, रणजित जाधव,  तुकाराम साळोखे, रमेश खाडे, दीपक चव्हाण, बाळासाहेब झालटे-पाटील, मंगळवार पेठ विभाग प्रमुख गजानन भुर्के, धनाजी दळवी, धैर्यशील जाधव, मोहनराव साळोखे, आबा जगदाळे, राजाभाऊ घोरपडे, अंकुश निपाणीकर, महिला आघाडी शहर प्रमुख मंगल साळोखे, गौरी माळदकर, दिपाली पाटील, मंगल कुलकर्णी आदी सहभागी झाल्या होत्या.