|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आण्णांचा सावकारांना ‘दे धक्का’

आण्णांचा सावकारांना ‘दे धक्का’ 

प्रा. उत्तम शिंदे / महेश शिंपुकडे

  चिकोडी

संपूर्ण कर्नाटकासह सीमावर्ती महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि पारंपरिक लढतीतून जिंकण्याची इर्षा लागलेल्या चिकोडी लोकसभा निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या लढतीत काँग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांचा पराभव करत भाजपाचे उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांनी 1 लाख 18 हजार 887 मताधिक्क्याने विजय मिळविला. तर बेळगावमध्ये भाजपचेच पुन्हा कमळ फुलले. तसेच विजापुरात केंद्रीय मंत्री रमेश जिगजिनगी यांनी हॅट्ट्रिक मारताना निजदच्या सुनीता चव्हाण यांना पराभवाची धूळ चारली. तर बागलकोटमध्ये भाजपचे विद्यमान खासदार पी. सी. गद्दीगौडर यांनी विजयी चौकार लगावला. दरम्यान भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांसह विजयी जल्लोष साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.

गुरुवारी सकाळी 8 वाजता चिकोडी येथील आर. डी. कॉलेजमध्ये निवडणूक अधिकारी, कर्मचारी, निरीक्षक व उमेदवारांचे एजंट आदींच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडण्यात आले. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार इटीपीबीएस व पोस्टल मतांच्या मोजणीस प्रारंभ करण्यात आला. ही मोजणी करत असताना सर्व्हर डाऊन झाल्याने इटीपीबीएस मतमोजणीस अडचण निर्माण झाली. पुढील प्रक्रिया लांबू नये यासाठी निवडणूक अधिकाऱयांनी सकाळी 8.30 वाजता मतयंत्रातील मतमोजणीस चालना दिली. दरम्यान पहिल्या फेरीपासूनच भाजपाचे उमेदवार आण्णासाहेब जोल्ले  यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्यावर मताधिक्क्ममय घेण्यास प्रारंभ केला. हे मताधिक्क्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत अंतिम फेरीत 1 लाखाहून अधिक मतांनी विजय नोंदविला.

पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर भाजपाचे उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांनी 5932 मतांची आघाडी घेतली. यानंतर प्रत्येक फेरीमध्ये मतांच्या आघाडीचा आलेख चढतच राहिला. हा आलेख प्रत्येक फेरीनंतर दोन ते पाच हजारापर्यंत वाढतच राहिला. अंतिम फेरीत आण्णासाहेब जोल्ले यांना 6 लाख 45 हजार 17 तर प्रकाश हुक्केरी यांना 5 लाख 26 हजार 140 मते मिळाली.

चिकोडी लोकसभा क्षेत्राच्या मतमोजणीची यंत्रणा ठिक होती. पण फेरीनिहाय निकाल देण्यात येथील यंत्रणा फोल ठरल्याने मताधिक्क्याबाबत प्रत्येकजण वेगवेगळीच आकडेवारी सांगत होते. मतमोजणी इमारतीपासून सुमारे 500 मीटर अंतरावर मीडियारुमची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आँखो देखा हाल दाखविण्यात अडचण आली. मतमोजणी केंद्रावर होणारा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक अधिकाऱयांनी नेटके नियोजन करून केवळ पासधारक लोकांनाच निवडणूक केंद्रात प्रवेश दिला. केंद्राच्या आवारापासून लांब अंतरावर अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची वाहने लावण्यात आली होती. केंद्राबाहेर अधिकारी व कर्मचाऱयांसाठी सकाळी अल्पोपहार व दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

चिकोडी लोकसभेसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. पण खरी चुरस ही आण्णासाहेब जोल्ले व प्रकाश हुक्केरी यांच्यातच पहावयास मिळाली.23 एप्रिल रोजी मतदान पार पडले व तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी निकाल लागला. निकालापूर्वी दोन्हीही पक्षाकडून वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत होते. पण वर्तविण्यात आलेले सर्व अंदाज फोल ठरवत आण्णासाहेब जोल्ले यांनी घवघवीत यश संपादन करत भगवान के यहा देर है अंधेर नही या म्हणीप्रमाणे आपली किमया दाखवून राज्यातील लोकसभेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया चिकोडीत पुन्हा भाजपचा झेंडा फडकवून नवा इतिहास रचला.

पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला हरवून स्वप्न साकार

आण्णासाहेब जोल्ले यांनी सहकार क्षेत्रात काम करताना अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या. याबरोबरच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देताना बेळगाव जिल्हय़ाबरोबरच कर्नाटक व महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला. असे हे नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी होण्याची स्वप्न पाहताना सार्वत्रिक निवडणूक लढवत होते. यामध्ये अधिकतर वेळा हुक्केरी हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी बनले होते. गेल्या अनेक पराभवांचा वचपा काढत आण्णासाहेब जोल्ले यांनी मताधिवक्मयाने विजय मिळवत चिकोडी लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी होण्याचा मान मिळवत आपले स्वप्न साकार केले.