|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केंद्राच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविणार

केंद्राच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविणार 

वार्ताहर /   निपाणी

चिकोडी लोकसभा मतदारसंघातील सर्वच आठ विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य मतदारांनी आपल्याला विजयी केले. या विजयासाठी भाजपाच्या सर्व मतदारसंघातील आजी-माजी आमदार, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सर्वांच्या प्रयत्नांचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभीमुख नेतृत्त्वाचा हा विजय आहे. मिळालेल्या या संधीतून सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन नूतन खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी केले.

चिकोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा आपल्या उमेदवारीच्या माध्यमातून विजयीध्वज लावल्यानंतर नूतन खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी गुरुवारी सायंकाळी लागलीच चिकोडी येथील भाजपा कार्यालयात पत्रकार बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात भाजपाचा हा मतदारसंघाबरोबरच देशातील अभुतपूर्व विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवलेला ऐतिहासिक विजय आहे, असे सांगितले.

खासदार आण्णासाहेब जोल्ले पुढे म्हणाले, हे यश सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. 1 लाख 16 हजार 361 चे मताधिक्य म्हणजे मतदारांनी घडविलेला इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षात देशाच्या विकासाला दिशा दिली. असे असताना विरोधकांनी फक्त पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करण्याचे काम केले. पण मतदारांनी या टिकेला भिक न घालता विश्वासातून भाजपाला पाठबळ दिले. भ्रष्टाचार रहित देशाचा कारभार फक्त भाजपाच करु शकते याची ही पोहोचपावती आहे.

 माजी आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, मतदारांनी दाखवलेला विश्वास भाजपाच्या विजयाची नांदी ठरला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱयांचा सहभाग मोठा आहे. देश सुरक्षित ठेवण्याबरोबरच देशाला समृद्ध बनविण्याचा ध्यास आता मतदारांनी घेतला आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 350 खासदारांचे पाठबळ दिले आहे. लवकरच राज्यातील अभद्र युती असणाऱया निजद-काँग्रेसचे सरकार काहीही न करता कोसळेल व राज्यातही भाजपाचे सरकार सत्तेवर येईल, असे सांगितले.

यावेळी आमदार शशिकला जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी आमदार राजू कागे, चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष शशिकांत नाईक, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील यांच्यासह मान्यवर नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: