|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » किल्ला भाजी मार्केटमधील इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत

किल्ला भाजी मार्केटमधील इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत 

भाजी मार्केट स्थलांतराचा परिणाम

बेळगाव / प्रतिनिधी

किल्ला भाजी मार्केटचे एपीएमसीत स्थलांतर झाल्याने येथील भाजी मार्केट ओस पडले आहे. याचा परिणाम या ठिकाणी उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनवर झाला आहे. वर्षभरापूर्वी लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेले हे कॅन्टीन सध्या ग्राहकांअभावी बंद स्थितीत आहे. किल्ला भाजी मार्केटमध्ये दररोज होणारी गर्दी लक्षात घेऊन तसेच येथील कष्टकऱयांना सोयीचे व्हावे या दृष्टीने या ठिकाणी इंदिरा कॅन्टीनची उभारणी करण्यात आली होती. मात्र मागील आठवडय़ात किल्ला भाजी मार्केटचे एपीएमसीत स्थलांतर करण्यात आले. याचा परिणाम या कॅन्टीनवरही झाला आहे.

किल्ला भाजी मार्केटमध्ये दररोज सकाळपासूनच खरेदी विक्रीसाठी गर्दी होत असे. यामुळे त्यांना स्वस्त दरात उपहाराची सोय व्हावी या दृष्टीने किल्ला भाजी मार्केट येथे इंदिरा कॅन्टीनची उभारणी करण्यात आली होती. आणि या कॅन्टीनला ग्राहकांचा प्रतिसादही मोठा लाभला होता. भाजी मार्केटमध्ये येणाऱया कष्टकरी  सह नागरिकांनाही हे कॅन्टीन सोयीचे बनले होते. मात्र किल्ला भाजी मार्केटचे स्थलांतर एपीएमसी मध्ये करण्यात आल्यानंतर येथील सर्व व्यवहार ठप्प झाले. याचा परिणाम परिसरातील रस्त्या शेजारी असणाऱया चहा टपरीवरही झाला आहे. या व्यवसायिकांना आपला व्यवहार बंद करावा लागला आहे. तर आता लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेले इंदिरा कॅन्टीनही बंद करण्याची वेळ आली आहे.