|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्वाभिमानचे पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात!

स्वाभिमानचे पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात! 

आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट 

राणेंचा ईव्हीएम हेराफेरीचा आरोप मुलाच्या समजुतीसाठीच!

वार्ताहर / कणकवली:

मागील लोकसभा निवडणुकीत 150 वर्षांच्या पक्षातून निवडणूक लढवून राणेंचा पराभव झाला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही राणेंचा पराभव अटळ आहे. पराभव होणे हे राणेंसाठी आता नवीन नाही. राणेंनी किती लेबले बदलली तरी काही फरक पडणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांनी आता जिह्याचा विकास हवा असेल तर राणे प्रा. लि. पक्षात न राहता विकास करणाऱया पक्षाच्या पाठिशी राहावे, असे आमदार वैभव नाईक यांनी येथे सांगितले.

येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांनी आमदार नीतेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत 150 वर्षांच्या पक्षातून निवडणूक लढवून राणे पराभूत झाले. या निवडणुकीत वडील खासदार व भाऊ आमदार असूनही नीलेश राणेंचा पावणदोन लाखाच्या मताधिक्याने पराभव झाला. जनता राणेंना कंटाळली आहे. त्यामुळेच मतदारसंघाने राणेंना नाकारले.

यापुढे कुठलाही पक्ष व कुठलेही चिन्ह असले, तरी राणेंचा पराभव अटळ आहे. गेल्या चार वर्षांत जिह्याचा विकास करीत असताना केवळ विकासाला विरोध करण्याचे कामे राणेंनी केले. काही विकावू मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर आरोप करण्यात आले. आमदार नीतेश राणे यांनी मतदारसंघात खोटय़ा व फसव्या योजना राबविण्याची घोषणा केली. मात्र, या साऱया योजनाच बंद पडल्या. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपचे सरकार राज्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी प्रा. लि. पक्षाची साथ सोडून विकास करणाऱया शिवसेना-भाजपसोबत यावे. लोकसभा निवडणुकीत पराभव होणार हे नारायण राणेंना माहिती होते. मात्र, मुलाची समजूत काढण्यासाठी ते ईव्हीएमच्या हेराफेरीचा आरोप करीत आहेत, अशी टीकाही नाईक यांनी केली.

राणेंना जनता स्वीकारत नाही!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राणेंच्या कार्यकर्त्यांना जनता निवडून देते. पण, राणे उमेदवार असले की जनता त्यांना मते देत नाही, हे गेल्या कित्येक निवडणुकांमधून दिसून आले आहे. त्यामुळे जनता कार्यकर्त्यांना स्वीकारते, पण, राणेंना नाही, असे दिसून आले असल्याचे नाईक म्हणाले.