|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न’ आता सोमवार ते गुरुवार

‘चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न’ आता सोमवार ते गुरुवार 

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असे म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे ‘पॅप्टन ऑफ द शिप’ तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा छोटय़ा पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे.

प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करत असतानाच ‘होऊ दे व्हायरल’ या यशस्वी पर्वानंतर आता झी मराठीचे लाडके कलाकार ‘शेलिब्रिटी पॅटर्न’ या नव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9.30 वाजता छोटय़ा पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. पण आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हा हास्यकल्लोळ आता फक्त सोमवार मंगळवारीच नाही तर आठवडय़ातून चार दिवस होणार आहे. आता प्रेक्षक सोमवार ते गुरुवार त्यांच्या आवडत्या कलाकारांना कॉमेडी करताना पाहू शकणार आहेत.