|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी

संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी 

पुणे / प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलेल्या सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयाकडून रविवारी 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुणे न्यायालयात संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना रविवारी हजर करण्यात आले. या वेळी सरकारी वकीलांकडून युक्तिवाद करण्यात आला. विक्रम भावेने दाभोलकरांचे मारेकरी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला हत्येसाठी रेकी करायला मदत केली आहे. तसेच दाभोलकरांच्या हत्येसाठी मारेकऱयांनी वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यासाठी विक्रम भावेची चौकशी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. संजीव पुनाळेकरने दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्याप्रकरणात वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केली असून मारेकऱयांच्या व्यापक कटाची माहिती उघडकीस येण्यासाठी पुनाळेकरची चौकशी करणे गरजेचे आहे, अशी बाजू सरकारी वकीलांनी न्यायालयात मांडली.

पुनाळेकरने स्वतःच स्वतःची बाजू न्यायाधीशांसमोर मांडली

संजीव पुनाळेकर याने स्वतःच स्वतःची बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. शरद कळसकर आठ महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर लगेच त्याचा जबाब नोंदवला गेला. मग त्याच्या जबाबानुसार मला अटक करण्यासाठी इतका वेळ का लागला? असा सवाल त्याने केला. शरद कळसकर हा माझा अशील आहे. त्याच्या कृत्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जाऊ शकत नाही, असे म्हणणे त्याने मांडले

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकीलांनी संजीव पुनाळेकर हा हत्येच्या साखळीतील कारस्थानामधे सहभागी असल्याचे न्यायालयासमोर सांगितले आहे. यावेळी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

दोघांना मुंबईतून अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने काल सनातनचा वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला मुंबईतून अटक केली आहे. हत्येच्या कटात सहभागी होणे आणि हत्येनंतर पुरावे नष्ट केल्याचे आरोप दोघांवर आहेत. संजीव पुनाळेकरवर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.

हत्येसाठी वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर हत्येवेळी दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. संजीव पुनाळेकर हा दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडत आहे. तसेच पुनाळेकर या प्रकरणातील फरार आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय सीबीआयला आहे.

विक्रम भावे ठाण्यातील बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी

विक्रम भावेला 2008 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जामिनावर सुटल्यावर तो वकील संजीव पुनाळेकरला मदत करत होता. पुनाळेकरने शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला मुंबईतील खाडी पुलावरुन शस्त्र फेकून देऊन नष्ट करण्याची सूचना केली, त्यावेळी विक्रम भावे तेथे हजर होता. नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला एटीएसने अटक करण्यात आली होती. दोघांच्या चौकशीत एटीएसला पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचे धागेदोरे सापडले. त्यानंतर दाभोलकरांवर गोळय़ा झाडणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर अंदुरे आणि कळसकर हेच दोघे असल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली.