|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ट्रक-लक्झरी बसची वाठारस्टेशननजिक समोरासमोर धडक,

ट्रक-लक्झरी बसची वाठारस्टेशननजिक समोरासमोर धडक, 

वार्ताहर/ कोरेगांव

कोल्हापूरहून उत्तर भारतात देवदर्शन व सहलीसाठी निघालेल्या लक्झरी बस व ट्रकची सातारा- लोणंद रस्त्यावर वाठार स्टेशन ते आदर्का फाटय़ादरम्यान समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. निष्णाई पेट्रोल पंपाजवळ  महाकाली दरी येथे रविवारी सकाळी ठीक 6 वाजता ट्रक व लक्झरीचा अपघात झाला. यामध्ये 1 ठार तर 3 गंभीर व 10 प्रवासी भाविक किरकोळ जखमी झाले. अपघातात सागर भरत कमाने (वय 21 रा. उंब्रज) हा ठार झाला असून तो सर्पमित्र आहे.

  घटनास्थळावरून व पोलीससूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कोल्हापूरहून उत्तर भारताच्या सहलीला निघालेली लक्झरी क्रमांक MH 04 GP 9570 या लक्झरी बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवासासाठी निघाले होते. त्यांची ही सहल 28 दिवसासाठी उत्तर भारतात देवदर्शनासाठी निघाली होती. यामध्ये कोल्हापूर, इस्लामपूर, मणेराजुरी, बोरगाव, उंब्रज, कोरेगाव या ठिकाणचे प्रवासी होते. ही लक्झरी बस वाठार स्टेशन जवळील असणाऱया पेट्रोल पंपाजवळ येताच पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेला ट्रक क्रमांक MH12 LT 9962 याला भरधाव लक्झरीने समोरासमोर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, गाडीतील साखरझोपेत असणाऱया प्रवाशांना काही कळायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. भरधाव लक्झरीने अक्षरशाः ट्रकच्या चालक बाजूला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत ट्रकची केबिन लक्झरीच्या केबिनमध्ये शिरून ड्रायव्हरच्या वरील बाजूस बाल्कनी सीटवर झोपलेला सागर भरत कमाने (वय 21 रा. उंब्रज) याच्या डोक्यात शिरलेल्या ट्रकच्या अँगलमुळे डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात सातारा येथे हलवण्यात आले परंतु तो त्या ठिकाणी मयत झाला.

 लक्झरीच्या भिषण धडकेत स्टेरिंगच्या रॉड व बोनेटमध्ये अडकलेला ट्रक ड्रायव्हर विजय बाबुराव वैरागर (रा. केडगाव चौफुला) याच्याही उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यालाही मोठय़ा कसरतीने वाठार पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. तसेच या अपघातात लक्झरीमधील सूर्यकांत जगन्नाथ जाधव (रा.उंब्रज), पांडुरंग शंकर घाडगे (रा.बोरगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.  त्याचबरोबर दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यापैकी शांताबाई पांडुरंग घाडगे (रा. बोरगाव), वैजंता तानाजी पवार (रा. मणेराजुरी), शोभाताई मनोहर कुंभार (रा. मळणगाव), आक्काताई सदाशिव कुंभार (रा. मळणगाव), आशिष कुमार केदार मल्लाप्पा (रा. मुळशी), प्रभावती बाबुराव कुंभार (रा. मळणगाव), तानाजी दत्तू पवार (रा. मणेराजुरी), रजनीकांत कैलास कांबळे (लक्झरी ड्रायव्हर रा.कोल्हापूर,) अनिल किसन शिंदे (रा.उंब्रज), वैजंता जगन्नाथ जाधव (रा.उंब्रज) या सर्व जखमींना 108 नंबरच्या ऍम्ब्युलन्सने वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी पाठवले व तिथून सातारा येथे पाठवले.

  अपघाताची खबर समजतात वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले. पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने गंभीर जखमींना व किरकोळ जखमी झालेल्यांना तातडीने 108 नंबरच्या ऍम्बुलन्सने प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले.

अपघातग्रस्तांना तडवळे ग्रामस्थ तसेच रस्त्यावरील इतर वाहनधारकांनी मदत करत माणुसकीचे दर्शन दाखवले. पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची वेळीच मदत मिळाली व सतर्कता दाखवल्याने अनेकांचे प्राण वाचले. दरम्यान, अपघातानंतर सुमारे साडे चार तास सातारा-लोणंद रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूला लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर वाठार पोलिसांनी शिवाररस्त्याने वाहने काढली.  

ग्रामस्थ व पोलिसांची मदतीसाठी धाव व मदतीचा आधार

वाठार व तडवळे दरम्यान अपघात घडल्याची माहिती मिळताच वाठार पोलिसांची टीम घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. तडवळे ग्रामस्थ व युवकांनी या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली यामुळे मदतकार्य तत्काळ झाले व अनेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर तडवळेतील युवकांनी त्यांच्या नातेवाईकापर्यंत माहिती पोहचवण्यासाठी मदत करीत या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बसमधील प्रवाशांना पाणी, चहा व नाष्टय़ाची सोय केली. बहुतांश प्रवासी कोल्हापूर जिह्यातील असल्याने त्यांचे नातेवाईक घटनास्थळी यायला दुपार झाली.

Related posts: