|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » क्रिकेटचा महाकुंभ

क्रिकेटचा महाकुंभ 

क्रिकेटच्या महाकुंभ मेळय़ाला जन्मभूमी इंग्लंडमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे पुढील जवळपास दीड महिना क्रिकेटप्रेमींचे लक्ष हे क्रिकेट पंढरीच्या मैदानावरील या घनघोर ‘रन’संग्रामाकडे राहणार, हे निश्चित आहे. विश्वचषकामध्ये एकूण दहा संघांचा समावेश असून, जुनेच शिलेदार चषक पटकावणार की नवा विजेता लाभणार, याबाबत उत्सुकता आहे. अर्थात भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, विंडिज, न्यूझिलंड, द. अफ्रिका या संघांकडून चाहत्यांच्या विशेष अपेक्षा असतील. 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कपवर नाव कोरणारा भारतीय संघ अर्थातच फेव्हरिट लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ समतोल मानला जातो. एकेकाळी गोलंदाजीच्या स्तरावर कमकुवत भासणाऱया टीम इंडियाचे वेगवान गोलंदाजी हेच प्रमुख बलस्थान असल्याचे दिसते. वेगाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱया ब्रेट लीनेही भारतीय गोलंदाजीच्या वर्चस्वाबाबत केलेले विधान बरेच काही सांगून जाते. आजमितीला जसप्रीत बुमराह हा देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरावा. टोकदार यॉर्कर, अफलातून स्विंग अन् भन्नाट वेग ही त्याच्या गोलंदाजीतील त्रिविधता कसलेल्या फलंदाजाचाही त्रिफळा उडविण्यासाठी पुरेशी ठरणारी म्हणावी लागेल. स्वाभाविकच त्याचा फॉर्म हा संघाच्या कामगिरीचा मुख्य गाभा ठरू शकतो. महम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांच्याकडेही वेगवेगळी आयुधे आहेत. तर कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल व रवींद्र जडेला यांच्या भात्यातही प्रभावी अस्त्रांचा समावेश पहायला मिळतो. या आपल्या जमेच्या बाजू मानता येतील. याखेरीज अष्टपैलू हार्दिक पंडय़ा, केदार जाधव असे पर्यायही आहेत. त्यामुळे गोलंदाजीत संघ नक्कीच वरचढ चढू शकतो. अर्थात फलंदाजीच्या आघाडीवर भारताला आणखी श्रम घ्यावे लागतील. मागच्या काही दिवसात सलामीची जोडी तितकीशी यशस्वी होताना दिसत नाही. रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनाही दोन्ही सराव सामन्यात ठसा उमटवता आलेला नाही. म्हणूनच यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्यक्ष रनभूमीवर या सलामीवीरांना पराक्रमाची शर्थ करावी लागेल. जगातील कोणत्याही खेळपट्टीवर वरचष्मा गाजविण्याची क्षमता असलेल्या कर्णधार कोहलीकडून या स्पर्धेतही ‘विराट’ खेळय़ांची आशा आहे. एकेकाळी सचिन तेंडुलकर हा भारतीय संघाचा तारणहार मानला जायचा. आता विराट हाच फलंदाजीचा मुख्य कणा आहे. स्वाभाविकच त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरू शकेल. बांग्लादेशविरूद्धच्या सराव सामन्यातील शतकातून के. एल. राहुल याने चौथ्या क्रमांकासाठी आपणच अधिक फिट असल्याचे दाखवून दिले आहे. इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर निव्वळ फटकेबाजीचे स्किल असून चालत नाही. तर तांत्रिकदृष्टय़ाही फलंदाज परिपूर्ण असावा लागतो. त्यादृष्टीने राहुल हा प्लस पॉईंट मानायला हवा. धोनीचा धडाका हेही शुभचिन्ह ठरावे. अर्थात केदार, हार्दिक फलंदाजीतही कशी चमक दाखवितात, यावरदेखील बऱयाच गोष्टी अवलंबून असतील. कारण नाही म्हटले, तरी कुठेतरी आपली फलंदाजी काहीशी डळमळीत वाटते. इंग्लंडमधील स्विंगचा प्रभाव पाहता अजिंक्य रहाणेसारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाला स्थान मिळायला हवे होते. कदाचित त्याची उणीव जाणवू शकेल. दुसऱया बाजूला यजमान संघही जेतेपदासाठी पात्र ठरावा, असा आहे. तीनदा अंतिम फेरीत पोचूनही विश्वचषकापासून वंचित राहिलेल्या इंग्लंडकडे ज्यो रूटसारखा हुकमी एक्का आहे. इयान मॉर्गन, बेअरस्टो, बटलर, जेसन रॉय, बेन स्टोक्स, वोक्स, वूड अशी लंबी फौजही आहे. घरच्या मैदानावर ते कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विंडिजचा संघ हा तर स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्धच आहे. न्यूझिलंडविरूद्धच्या सराव सामन्यात 421 धावांचा डोंगर उभारून त्यांनी आपली चुणूक दाखवूनच दिली आहे. गेल, लुईस, ब्राव्हो, होप, हेटमायर, रसेल, होल्डर, ब्रेथवेट अशी खोलवर फलंदाजी असलेला हा संघ कधी कुणाला दणका देईल, हे सांगता येणार नाही. गोलंदाजीच्या पातळीवरही अनेकविध पर्याय असल्याने वर्ल्डकपमध्ये हा संघ ‘रोच’कपणा आणेल, हे नक्की. तब्बल पाच वेळा जगज्जेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियाची ताकदही डेव्हिड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ परतल्याने वाढल्याचे पहायला मिळते. कर्णधार फिंचसह उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मॅक्सवेल असे प्रतिभावान फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मिचेल स्टार्क, कमिन्स, लायन, झाम्पा ही गोलंदाजीची फळीही गुणवान. वर्ल्ड कपमध्ये 100 टक्के योगदान देणे, हा कांगारूंचा स्थायिभावच आहे. त्यामुळे जेतेपदासाठी ते सर्वस्व पणाला लावणार, यात संदेह नाही. गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही ऐनवेळी कच खाण्यासाठी ख्यातकीर्त असलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही नजरेआड करता येत नाही. फेफ डुप्लेसी, हशिम आमला, डिकॉक, मिलर, डय़ुमिनी, रबाडा, एनगिडी, ताहिर अशी मजबूत फळी त्यांच्याकडे आहे. चोकर्सचा शिक्का पुसून नवा इतिहास घडविण्याची संधी या शिलेदारांना आहे. त्यात परफॉर्मन्स व नशीब यांची बेरीज कशी होते, हे पहायचे. विल्यम्सन, मार्टिन गप्टील, रॉस टेलर, मुन्रो, बोल्ट, टीम साउदी अशा कसदार खेळाडूंचा समावेश असलेला न्यूझिलंड संघ तिन्ही आघाडय़ांवर समतोल वाटतो. गतवेळच्या या उपविजेत्यासही आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. पाकिस्तानची टीम सध्या पूर्वीइतकी तगडी नाही. त्यामुळे हा संघ कुठवर मजल मारणार, हे पहावे लागेल. अर्थात सर्फराज अहमद, बाबर आझम, वहाब रियाझ यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. बांग्लादेशचा संघ धक्कादायक निकालांसाठी ओळखला जातो. 2007 मध्ये भारताला या संघाने दिलेला धक्का अजूनही क्रिकेटप्रेमी विसरले नसतील. या संघाकडे कर्णधार मोर्तझा, रहमानसह अनेक शिलेदार आहेत. रणतुंगा, जयसूर्या, डिसिल्वाच्या काळात श्रीलंकेची टीम सर्वच स्तरावर परफेक्ट होती. आज त्यांची स्थिती करुण म्हणायला हवी. तरीही मॅथ्यूज, मलिंगा, परेरासारखे काही गुणवान खेळाडू त्यांच्याकडे नक्कीच आहेत. अफगाणिस्तानचा संघही आता खेळपट्टीवर स्थिरावताना दिसत आहे. हे बघता रशीद खान, नबी, कर्णधार नैब यांच्याकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेंपररी असे क्रिकेटमध्ये म्हणतात. स्वाभाविकच क्रिकेट पंढरीत सर्वच क्रिकेटपटूंच्या क्लासचा कस लागेल. हार, जीत हा खेळाचा भागच असतो. जिंकण्याची ईर्षा हवी. मात्र, पराभवाने खचून न जाता प्रत्येक सामन्याचा आनंद घेणेही महत्त्वाचे आहे. आपणही आजपासून क्रिकेटचा मनस्वी आनंद घेऊया.

 

Related posts: