|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘डी डे’ची पंचाहत्तरी

‘डी डे’ची पंचाहत्तरी 

फ्रान्समध्ये गुरुवार 6 जून रोजी ‘डी डे’ ची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. दुसऱया महायुद्धाला निर्णायक कलाटणी देणारा हा दिवस 6 जून 1944 रोजी अवतरला. या दिवशी हिटलरच्या जर्मनीने पादाक्रांत केलेला फ्रान्स त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी उत्तर फ्रान्समधील नॉर्मंडी किनाऱयावर दोस्त राष्ट्रांनी मोठय़ा संख्येने सैन्य उतरवले. या सैन्याने हिटलरने उभ्या केलेल्या अभेद्य ऍटलांटिक व्यूहरचनेचा भेद करून फॅसिस्ट जर्मनीस जबर तडाखा दिला. दुसऱया महायुद्धातील ‘डी डे’ म्हणूनच अत्यंत भव्य व महत्त्वपूर्ण मोहीम मानली जाते. सदर मोहिमेच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून नॉर्मंडीच्या 5 किनाऱयावर या युद्धात बलिदान दिलेल्या शूर सैनिकांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यास इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांच्यासह 13 राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते. काही राष्ट्रांनी आपले प्रतिनिधी या समारंभास पाठवले होते. या दिवशी 16 देशांच्या वतीने ‘आम्ही दुसऱया महायुद्धाच्या भयाणतेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही याची सामूहिक जबाबदारी घेत आहोत’ हे आश्वासक तत्त्व अधोरेखित करणारा जाहीरनामा प्रसारित करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर सध्यातरी तिसऱया महायुद्धाची शक्मयता दिसत नसली तरीही जागतिक पातळीवर साऱया देशादरम्यान समाधानकारक सौख्य व सौहार्द नांदत आहे असेही चित्र नाही. मध्य पूर्वेतील वातावरण स्फोटक आहे. आशियायी देशांदरम्यान विविध प्रकारचे तणाव व संघर्षमय स्थिती अस्तित्वात आहे. अमेरिका, चीन व रशिया या बडय़ा देशांच्या महत्त्वाकांक्षेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता चिंताजनक आहे. लॅटिन अमेरिका, युरोप, आफ्रिका येथील देशात डगमगणाऱया अर्थव्यवस्था, स्थलांतरे, बेरोजगारी यामुळे अशांतता आहे. काही इस्लामी राष्ट्रात मूलतत्त्ववादी, लष्कर व दहशतवादी सत्ता हाती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उत्तर कोरियासारखे देश हाती असलेल्या अण्वस्त्रांच्या बळावर जगास वेठीस धरू पहात आहेत. अशा अस्थिर स्थितीत कुठला छोटा संघर्ष केव्हा रौद्ररूप धारण करेल याची शाश्वती देता येणे अशक्मय बनले आहे आणि म्हणूनच ‘डी डे’ सारख्या दिवसाची दखल घेणे व त्याचे स्मरण ठेवणे औचित्यपूर्ण ठरते.

दुसरे महायुद्ध, फ्रान्समधून जर्मन फौजांना हटवून संपुष्टात आणण्यासाठीच्या प्रक्रियेचा ‘डी डे’ मोहीम हा महत्त्वपूर्ण भाग होता. ‘ऑपरेशन नेपच्यून’ हे या मोहिमेचे आणखी एक सांकेतिक नाव. दोस्त राष्ट्रांनी या मोहिमेबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती, उत्तर फ्रान्सचे पाच किनारे, ज्यांना ओमाहा, उताहा, जुनो, स्वोर्ड आणि गोल्ड अशी सांकेतिक नावे दिली होती, त्या किनाऱयांवर समुद्रमार्गे मोठय़ा प्रमाणात फौजा उतरवण्याची ही योजना होती. 5 जून 1944 रोजी ब्रिटनच्या किनाऱयावरून 7,000 जहाजातून 5 सैन्य गटांनी आक्रमणासाठी फ्रान्सच्या दिशेने प्रवास सुरू केला. वेळ होती रात्री दहाची. यानंतर मध्यरात्री 6 जून या दिवसाचा प्रारंभ होत असता नार्मंडीच्या किनाऱयावरील जर्मनीच्या ठाण्यांवर, तळावर दोस्त राष्ट्राच्या विमानानी तुफान बॉम्बहल्ले केले. 5,300 टनाहून अधिक बॉम्बस या हल्ल्यात टाकले गेले. पॅराशूट्सच्या आधारे सैन्यांच्या खास कृती दलास फ्रान्समध्ये उतरवून मोक्याचे पूल उद्ध्वस्त करून येणाऱया सैन्यासाठी महत्त्वपूर्ण संरचना व विभाग कब्जात घेण्यास आरंभ केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जहाजातून अमेरिका, कॅनडा व ब्रिटनच्या फौजा पाच किनाऱयांवर उतरवण्यात आल्या. या फौजांना जर्मनीच्या तीव्र युद्ध प्रतिकारास तेंड द्यावे लागले. यावेळी दोस्त राष्ट्रांनी 1 लाख 35 हजार सैन्य आणि दहा हजार वाहने किनाऱयांवर उतरवली. प्राथमिक संघर्षातच दोस्त राष्ट्रांचे 4,400 सैनिक मारले गेले तर हजारो जखमी झाले. काही बेपत्ता झाले. मोठय़ा संख्येने जर्मन सैनिक आणि फ्रेंच नागरिकही ठार झाले. यानंतर ऑगस्टपर्यंत जर्मनीशी घनघोर युद्ध संग्राम झडला. योजनेनुसार आपल्या तळांवर सैन्यांची पुन्हा भर्ती करण्यास जर्मनीस वेळ न देता त्याहून अधिक वेगाने दोस्त राष्ट्रांची कुमक वाढवण्यात यश आले. त्यानंतर मग दोस्त सैन्याने पॅरिसपर्यंत जर्मन सैन्यास हटवले आणि 25 ऑगस्ट 1944 रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस दोस्त सैन्याच्या ताब्यात देऊन शरणागती पत्करली. यानंतर काही महिन्यांनी दुसरे महायुद्ध संपुष्टात आले, ते मानवी प्रवृत्ती हिंसाचाराचे किती भीषण व प्रलंयकारी रूप धारण करू शकते आणि त्यातून भयाण विध्वंसांचे कोणते चित्र उभे राहते याचे थरकाप उडवणारे दर्शन देतच.

हा दिवस जगाच्या दृष्टीने केवळ श्रद्धांजली वाहण्याचा, युद्ध पराक्रम चर्चिण्याचा मुळीच नाही, तर असे दिवस पुन्हा पाहण्याची जगावर वेळ येऊ नये म्हणून चिंतन करण्याचा आणि यासाठी काय करता येईल यावर साकल्याने विचार विमर्श करण्याचाही आहे. अण्वस्त्रबंदीचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही, शस्त्रास्त्रे व लष्कर यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे अद्याप जमलेले नाही. युद्धखोर प्रवृत्ती आणि युद्धखोरीची भाषा निवळलेली नाही. वंशवाद, धर्मवाद, दहशतवाद, सीमावाद, आर्थिक चढाओढी व आर्थिक साम्राज्यवाद हे विषय जाणवण्याइतके तीव्र बनले आहेत. देशादेशातील समस्या, संघर्ष, मानवाधिकार व अन्य इतर विषय हाताळणारी जागतिक संघटना ‘युनो’ दुसऱया महायुद्धानंतर शिकलेल्या शहाणपणातून आकारास आली. परंतु जागतिक पातळीवर न्यायाधीशाची भूमिका वठवणाऱया या संस्थेचे निर्देश व नीतिनियम धाब्यावर बसवून अनेक मोठी व छोटी राष्ट्रे मनमानी करताना दिसत आहेत. एकूणच जागतिक परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. ‘समाजाची स्मरणशक्ती कमजोर असते’ असे म्हटले जाते म्हणूनच स्मरण जागृती करून शांततेच्या दृष्टीने जागतिक समाजाने विधायक वाटचाल करण्यासाठी ‘डी डे’सारखे दिवस गांभीर्याने साजरे होणे अगत्याचे ठरते.

अनिल आजगावकर 9480275418