|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपात प्रवेश करणार ही निव्वळ अफवा

भाजपात प्रवेश करणार ही निव्वळ अफवा 

प्रतिनिधी/ मडगाव

आपण काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कायकर्ता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाण्याचा आपला कोणताही निर्णय झालेला नसून आपण काँग्रेससोबतच राहणार आहे. आपण भाजपात जाणार ही फक्त अफवा आहे. त्यावर आपल्या कार्यकर्त्यांनी तसेच राज्यातील अन्य जनतेने विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनी शुक्रवारी दिले.

मडगावातील दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  डायस बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व ज्यो डायस हेही उपस्थित होते. हल्लीच आपल्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्याने आपण चांदर येथे आपल्या 500 कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेतली होती. त्यात आपण राजकारणासंर्भात कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेईन असे स्पष्ट केले होते. पण याचा अर्थ आपण भाजपात प्रवेश करणार असा होत नाही. आपल्याला जर भाजपात प्रवेश करायचा असता, तर बाकी आमदारांप्रमाणे कार्यकर्त्यांना न सांगताच आपण गेलो असतो, असे डायस याप्रसंगी म्हणाले.

पुंकळ्ळी मतदारसंघाचा विकास हेच आपले उद्दिष्ट आहे. पण गोवा फॉरवर्ड हा पक्ष आपल्या मतदारसंघात विकासकामे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोप डायस यांनी पुढे बोलताना केला. हे योग्य नसून गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना आपण पराभूत केले होते. पण त्यांनी आपल्या कामात कधीही अडथळा आणलेला नाही. गोवा फॉरवर्ड आपल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न का करत आहे तेच आपल्याला कळत नाही, असे ते पुढे बोलताना म्हणाले.

डायस सदैव काँग्रेससोबत : चोडणकर

गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे आमदार क्लाफास डायस हे भाजपात प्रवेश करतील अशा अफवा पसरत आहेत. पण डायस हे काँग्रेसचे चांगले नेते आहेत. त्यामुळे ते सदैव काँग्रेससोबत राहतील आणि आपल्याला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तसेच त्यांनी हल्लीच चांदर येथे बैठक घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हेच सांगितलेले आहे. कुंकळ्ळीचा विकास हेच त्यांचे ध्येय असून त्यामुळे भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या तीन आमदारांसारखे डायस नाहीत, असे यावेळी बोलताना चोडणकर म्हणाले.

श्रेय मिळू नये यासाठी अडथळे

डायस यांच्या विकासकामांत गोवा फॉरवर्ड अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातील विकासकामांचे श्रेय त्यांना मिळू नये यासाठी तो पक्ष अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्ड कुंकळ्ळी मतदारसंघाला ‘फॉरवर्ड’ नेण्याची स्वप्ने पाहत होता. आज तेच कुंकळ्ळी मतदारसंघाचा विकास रोखू लागलेले आहेत, असा आरोप चोडणकर यांनी पुढे बोलताना केला. ज्या प्रकारे भाजप पैशांचा वापर करत आहे ते पाहता काँग्रेसचे आणखी आमदार भाजपात प्रवेश करतील की नाही यावर बोलणे खूप कठीण आहे. काही वेळा भाजपाच्या दबावामुळे इतर पक्षांच्या आमदारांसमोर भाजपात प्रवेश करण्याशिवाय आणखी कोणताही पर्याय राहत नसतो, असा दावा त्यांनी केला.

Related posts: