|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » महात्मा फुले संग्रहलयात होणार कायमस्वरुपी कलादालन

महात्मा फुले संग्रहलयात होणार कायमस्वरुपी कलादालन 

 

 पुणे / प्रतिनिधी : 

महात्मा फुले वस्तू संग्रहालयात एक विभाग चित्रांसाठी ठेवण्यात आला आहे. हे संग्रहालय सरकारी असले तरी शासनाची कोणतीही मदत न घेता आम्ही त्याची दुरुस्ती केली आहे. पुणे शहराची ओळख असलेल्या या संग्रहालयातील या चित्र दालनात आधीच काही चित्र आहेत. परंतु ही जागा आम्ही कायमस्वरूपी कलादालनासाठी देऊ इच्छित आहोत. येथे चित्र, शिल्प अशा कलांसाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा प्रस्ताव पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी कलाकारांपुढे मांडला.

निवडक 45 चित्रकारांची चित्रे प्रथमच एकाच व्यासपीठावर ‘व्हीनस आर्ट फेस्ट 2019’ हे चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने आली आहेत. व्हीनस टेडर्सच्या 45 वर्धापनदिनानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन खासदार बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हीनस टेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पकार जितेंद्र सुतार, कलेच्या क्षेत्रात डिलीट पदवीचे पहिले मानकरी ठरलेले मुरली लाहोटी, मराठी स्वाक्षऱयांमधील सर्जनशील कलाकार गोपाल वाकोडे, कला शिक्षण क्षेत्रातून डॉ. अवधूत अत्रे, डॉ. मिलिंद ढोबळे, आर्ट टू डे गॅलरीच्या प्रियंवदा पवार, डॉ. सुभाष पवार यांचे सत्कार बापट यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.

राजकारणापासून वेगळे वातावरणात आल्याने चित्रांच्या या दुनियेत एक नवी स्फूर्ती मिळते असे सांगत बापट म्हणाले, “केवळ चेहरेच बोलतात असे नाही तर चित्रही बोलतात. चित्रांची भाषा आंतरिक असते. त्यातून चित्रकाराच्या भावना, संवेदना, वेदना हे सारेच व्यक्त होत असतात. ही कला अनादिकालापासून आहे आणि पुढेही अशीच राहील. बऱयाचदा एखाद्या प्रश्नाचे गांभीर्य त्यावरील पुस्तक वाचूनही जेवढे कळणार नाही त्यापेक्षा लवकर त्यावरील चित्र बघून समजते.’’

राजकारण आणि राष्ट्रकारण यात फरक आहे आणि या सरकारच्या विजयानंतर राष्ट्रकारण सुरु होत आहे अशी भावना व्यक्त करत परांजपे म्हणाले, पूर्वी शासन दरबारी कलेला, कलाकारांना फार मान होता. तो आता कमी झाल्यासारखा वाटतो आहे. जेवढे महत्व बॉलीवूड आणि क्रिकेटला आहे तेवढे शिल्पकला, चित्रकलेला उरलेले नाही असे जाणवते. या कलांना महत्व देऊन पुढे नेणे गरजेचे आहे.