|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अहंकाराचा वारा न लगो….

अहंकाराचा वारा न लगो…. 

गोष्ट तशी साधीच. कुठंही घडणारी. आमच्या निवासी संकुलात एका सदनिकेत राहणाऱयांकडं एक छोटी मुलगी पाहुणी आली. छोटी म्हणजे 6/7 वर्षांची! ती ज्यांच्याकडं आली तीही तरुण गृहिणी… तिच्या मैत्रिणीची ही मुलगी. मुलीची आई एका लग्नासाठी आलेली. जवळच्या नात्यातलं लग्न. पण ही छोटी मात्र कधी लग्नघरी गेली नाही. ती आपली ‘मावशी’कडं थांबलेली. खरंतर अशा छोटय़ा पोरींना लग्नघर खूप आवडतं. माझ्या मनात आलं की ही पोर आईबरोबर लग्नघरी का जात नाही? योगायोगानं मला ती छोटी आणि तिची ‘मावशी’ मला एकदा लिफ्टमध्ये भेटल्या. मी सहजच माझ्या मनातला प्रश्न विचारला. मावशी म्हणाली, “हिला गोंधळ आवडत नाही. लग्नघरी खूप माणसं आहेत. हिला तशी सवय नाही. बोलायलाही कमीच लागतं. माझी थोडी सवय असल्यानं माझ्याकडं राहातेय्!’’ विषय तिथं संपायला पाहिजे होता. पण माझ्या मनात तो घुमतच राहिला. एवढीशी ती पोर.. तिला माणसांची सवय नाही. गोंधळ आवडत नाही… हिचं पुढं कसं होणार. मन जेव्हा सैरभैर होतं तेव्हा आधार द्यायला संतसाहित्य धावून येतं. आज श्रीनामदेव महाराज असेच धावून आले. त्यांनी ईश्वराकडं मागणं मागताना ‘अहंकाराचा वाराही’ हरिदासांना लागू नये अशी मागणी केली. हा अहंकार मोठा उपद्रवी आहे. त्याला नाहीसं करणं तर कुणालाही जमणं महाकठीण असतं. जन्मत:च तो येतो. मरेपर्यंत सोबतच राहतो. मग त्याचा वाराही न लागणं कसं शक्मय आहे? पुन्हा नव्या प्रश्नानं माझं मन व्यापलं. तेवढय़ात मोबाईलवर एक संदेश माझ्या हाती लागला. संदेश असा आहे,

‘ज्ञानेश्वरी वाचनातील सहज आलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा, ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये.’ यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? माउली म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी झाला. तर असा हा अहंकार! याची गम्मत अशी की स्वत:जवळ काही खास असेल तर त्याचा अहंकार वाटू शकतो, हे समजू शकतं! पण अनेकदा काहीही जवळ नसलं तरी हा पठ्ठय़ा आपला फणा काढतोच! त्यातही मजा अशी की अहंकार जास्त धुमाकूळ घालतो तो ज्ञानी म्हणणाऱयांच्या आयुष्यात! श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अहंकार मोठा नवलाईचा आहे. तो अडाणी माणसाच्या वाटेला फारसा जात नाही. उलट ज्ञानी माणसाच्या कंठी झोंबून तो ज्ञानी माणसाला नाना संकटात नाचवतो. म्हणूनच तर या अहंकारापासून सतत वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अहंकाराला नाहीसं करता येत नसलं तरी त्याला ‘ताब्यात’ नक्कीच ठेवता येतं. ही विद्या शिकवण्याची पहिली जबाबदारी असते आई-वडिलांची! आता या छोटय़ा मुलीचंच बघा ना! तिच्या अहंकाराला आवरण्याऐवजी तिच्या आईनं एक सोपी पळवाट शोधली… मैत्रिणीकडं सोडण्याची! आईनं म्हणायला पाहिजे होतं की ‘माणसांची वर्दळ का नको वाटते? तुला तिथं यावंच लागेल. लोकांमध्ये रमावंच लागेल. चार दिवसांचाच तर प्रश्न आहे!’ पण तिनं तसं केलं नाही. उलट त्या छोटीचा अहंकार सांभाळला जाईल असाच मार्ग तिनं शोधला. पुढच्या आयुष्यात त्या छोटीला हाच अहंकार खूप नडणार आहे, हेही त्या आईनं लक्षात घेतलं नाही. लहानपणी शाळेचा अभ्यास घेण्याविषयी सतत काळजीत असणारे पालक, अहंकाराला ताब्यात ठेवण्याचा पाठ पाल्यांना का शिकवत नाहीत? ते विसरतात की आयुष्य आपल्या स्वत:च्या सोयीनं उलगडत नसतं. सगळं जग आपल्या हिशोबानं कसं वागेल? का वागेल? मला सर्वांशी मिळतं-जुळतं घेऊन जगता आलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टीतून हा महत्त्वाचा संस्कार करता येतो. आपली परंपरागत शिकवण आहे, ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा!’ ही शिकवण आपण कशी विसरलो? आपल्याजवळ जे आहे ते वाटून उपभोगण्यातला आनंद आपण मुलांना का शिकवत नाही. देण्यासारखं सुख घेण्यात नाही, हे मुलांना सांगायलाच हवं. मन विशाल करायचं म्हणजे ते काय रबरासारखं ताणून मोठं करायचं का? रबर असो की मन; ताणलं की तुटणारच! न ताणता ते मोठं करायचं कसं? साधा मार्ग परमार्थानं आपल्याला दिला आहे. परमार्थ म्हणजे इतरांना आपलं मानणं! इतरांचाही विचार करणं! श्रीनामदेवांच्या ताटातली पुरणाची पोळी पळवून नेणाऱया कुत्र्यामध्ये नामदेवांना परमात्मा दिसला आणि ती तुपाची वाटी घेऊन श्वानामागं धावले! आपण इतकं मोठेपण (आज तरी) दाखवू शकणार नाही पण दुसऱयांच्या सुख-दु:खाचा विचार करायची सवय तर लावून घेऊ शकतो ना?

सहलीला निघालेल्या मुलांना आपण सूचना देतच असतो. त्या देताना, नकळत असंही म्हणून जातो की, ‘बावळटासारखं तुझ्या डब्यातलं वाटत बसू नकोस.. तूच उपाशी राहशील!’ म्हणतो ना? हेच म्हणायचं पण थोडा बदल करून म्हणायचं. कसा बदल करायचा? “हे बघ, डब्यात मुद्दाम थोडा जास्त खाऊ दिला आहे. मित्रांनाही दे! एखाद्यानं डबा आणला नसेल तर त्यालाही दे! अरे, मिळून खाल्लं ना की थोडय़ानंही पोट भरतं!’’ एवढाच बदल अपेक्षित आहे. हाच परमार्थ आहे.

अहंकार पूर्णत्वानं जाणं अशक्मय आहे. तो व्यापक बनवता मात्र येतो. ‘मी’ ही अहंकाराची क्षुद्र अवस्था आहे. ‘आम्ही’ ही पुढची विकसित पायरी आहे. ‘आपण’  हा आणखी विकास आहे. ‘हे माझं घर’ पासून ‘हे विश्वची माझे घर!’ ही विकास-यात्रा म्हणजेच अध्यात्म नाही का? ‘च’ या अक्षराची जागा बदलली की आपण स्वत:ची जागा उंचावतो. ‘हे विश्व माझेच घर’ मध्ये ‘च’ मीपणासोबत आहे म्हणून तो क्षुद्र आहे. ‘हे विश्वच माझे घर’ मध्ये ‘च’ विश्वासोबत आहे म्हणून तो महान आहे. अहंकाराच्या ताब्यात आपण गेलो की आपण क्षुद्र होतो. अहंकार आपल्या ताब्यात ठेवला की आपण उन्नत होतो. ‘उन्नत’ व्हायचं की ‘उन्मत्त’ व्हायचं हे समजणं म्हणजे परमार्थ! अशा परमार्थाच्या वाटेवरचे पहिले सद्गुरु असतात आई-वडील!! त्यांनी हे भान ठेवलं तर पृथ्वीचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही.

विवेक घळसासी