|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबईच्या चालकाचा नावळेत आकस्मिक मृत्यू

मुंबईच्या चालकाचा नावळेत आकस्मिक मृत्यू 

प्रतिनिधी / वैभववाडी:

नावळे येथे चालक म्हणून आलेल्या जितेंद्र नारायण लवंडे (35, रा. कांतीनगर डोंबिवली पूर्व) याचा रविवारी पहाटेच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत नावळे धनगरवाडी येथील प्रकाश रामू गुरखे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरखे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी गुरखे हे शनिवारी चारचाकी गाडी घेऊन गावी आले होते. या गाडीवर जितेंद्र लवंडे हा चालक म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण जेवण करून झोपण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर जितेंद्र गाडीमध्येच झोपण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी गुरखे त्याला उठवण्यासाठी गेले असता गाडीबाहेर दरवाजानजीक जितेंद्र मृतावस्थेत दिसला. याबाबतची माहिती गुरखे यांनी पोलिसांत दिली. त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जितेंद्रचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे वैभववाडी पोलिसांनी सांगितले.