|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गदिमांचे साहित्य हे मानवी जीवनाचे सर्वार्थाने दर्शन घडविणारे

गदिमांचे साहित्य हे मानवी जीवनाचे सर्वार्थाने दर्शन घडविणारे 

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

ग. दि. माडगूळकर यांनी काव्य विश्वाच्या दीर्घ प्रवासामध्ये शब्दांच्या पंखावर स्वार होऊन काव्याला अपेक्षित असलेल्या सगळय़ाच रंगाचे दर्शन रसिकांना घडविले. मानवी जीवनाची उकल सर्वार्थाने घडविणारी गदिमा ही शक्ती होती. त्यांचा काव्यप्रवास हा शब्दसौंदर्याने नटलेला होता. म्हणूनच गीत रामायणाच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहोचले असे उद्गार ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक राजन लाखे यांनी काढले.

गोमंतक साहित्य सेवक संडळातर्फे स्व. शशिकांत नार्वेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फोंडा येथे आयोजित केलेल्या ‘गदिमा प्रतिभा आणि प्रतिमा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मारवा क्रिएशन, फोंडा आणि प्रतिभा फेन्ड्स सर्कल बोरी यांच्या सहकार्यने येथील राजदीप गॅलरियामध्ये हे व्याख्यान झाले.

काव्य हा गदिमांच्या जीवनाचा केंद्रबिंदू

गदिमा हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. कथा, पटकथ, संवाद, काव्य, कादंबरी, चित्रपट अशा सगळय़ाच क्षेत्रामध्ये त्यांनी विहार केला. परंतु काव्य हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. आत्मनिष्ठेला अनुभूतीची जोड मिळाल्यामुळे त्यांचा काव्यप्रवाह हा उद्बोधक आणि वेधक ठरला, जो त्यांच्या प्रतिभेला पोषक होता, असे श्री. लाखे पुढे म्हणाले. मुळातच गदिमांना वाचनाचे व्यासंग होते. त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक प्रगल्भ होती. त्यामागे चिंतन आणि मनन होते. सुक्ष्म निरीक्षणशक्ती, सामाजिक परिस्थितीची जाण, विषमता, अत्याचार, भ्रष्टाचार, अन्याय, बंड आदी विषयांना लेखणीच्या माध्यमातून जागृती आणि विरोध करण्याची कुवत त्यांच्या काव्यनिर्मितीमध्ये दिसते.

 लोकजीवन अत्यंत सहजतेने आणि सुलभतेने जगासमोर मांडताना काव्य रविकांची नाडी त्यांनी अचूक ओळखली होती. गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरींचा प्रभाव गदिमांच्या काव्यावर होता. आपल्या विविधांगी कवितांच्या माध्यमातून त्यांनी समाजमनावर सकारात्मक विचारांच्या बिजांची पेरणी केली. परिस्थितीला पचेल, रुचेल असे लिखाण करण्याबरोबरच समाजालाही चिंतनाच्या आणि मननाच्या गर्तेत लोटण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती, असेही श्री. लाखे यांनी नमूद केले.

जीवनाबद्दलची सकारात्मकता ‘झटकूनी टाक जीवा, दुबळेपणा मनाचा’ सारख्या त्यांच्या पद्य रचनामधून जाणवते. ‘इंद्रायणी काठी’ सारख्या अभंगामधून त्यांनी कवितेचे एक विलक्षण अंग, जे अध्यात्मिक शब्दरुपाने नटलेले आणि जीवाशिवाचे नाते सांगणारे असे काव्य रसिकाभिमुख केल्याचे सांगताना, ‘चांदोबा चांदोबा भागलास का ?’ या सारख्या बालविश्वाला कवेत घेणारे काव्यही त्यांनी अजरामर केले असे मत श्री. लाखे यांनी मांडले.

ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब

प्रेमरस, शृंगार आपल्या काव्यामधून व्यक्त करताना, गदिमांची लेखणी कधीही विभत्सरसाला शिवली नाही. ग्रामीण लोकांच्या व्यथा त्यांना ज्ञात होत्या. म्हणूनच त्यांच्या काव्यात ग्रामीण जीवनाच्या सुखदु:खाचे प्रतिनिधित्त्व करण्याची ताकद होती. अंधाराचे अधिष्ठान असल्याशिवाय प्रकाशाची उत्कटता उपभोगता येत नाही, ही उक्ती गदिमांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारी होती असे ते म्हणाले.

गीतरामायण हा वेचिव सौंदर्यांचा उत्तम नजराणा

 त्यांचे गीतरामायण म्हणजे वेचीव सौंदर्यांचा एक उत्तम नजराणा असून सौंदर्यपूर्ण शब्दरुपी धाग्यानी गीतरामायणाचे मुलायम वस्त्र त्यांनी विणले. वीररस, वात्स्यलरस, करुणारस, शांतरस अशा प्रत्येक रसाला त्यांनी आपले काव्यविश्व समर्पित केले असून ‘तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे’ ही त्यांची कविता काव्यरुपी प्रेयसीला उद्देशून त्यांनी लिहिली आहे. हास्यरसावरही त्यांच्या कविता आहेत. लावणी हा प्रकारही त्यांनी उत्तमरित्या हाताळला. ओजस्वल लेखणी, तेजस्वी शब्द हे माडगुळकरांच्या काव्याची गुणवत्ता मानली जाते, असे सांगताना गदिमांनी निसर्ग सौंदर्य, भाषेचे सौंदर्य आणि आशय विषयाचे संतुलन आपल्या कवितेतून सदैव साधले. अंधश्रद्धेबद्दलची चिड, भावनात्मकता, बैद्धिकता, आणि कल्पकता त्यांच्या काव्याचे गुणविशेष मानवे लागतील असे श्री. लाखे म्हणाले.

यमक हे काव्यातील पथ्य त्यांनी सांभाळले, मात्र ओढून ताणून यमक जुळविण्याची गरज त्यांच्या काव्यरचनेला कधीच भासली नाही. म्हणूनच त्यांच्या कविता वास्तववादी आणि विचार करायला लावणाऱया आहेत, असे मत श्री. लाखे यांनी शेवटी व्यक्त केले. साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी स्वागत केले. चित्रा क्षिरसागर यांनी सूत्रसंचालन तर जयंत मिरींगरकर यांनी आभार मानले.

Related posts: