|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दोन दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये

दोन दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये 

पुणे / प्रतिनिधी

नैर्त्रुत्य मोसमी पाऊस म्हणजे मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण कर्नाटकमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला आहे. तसेच अरबी समुद्राचा दक्षिण भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, ईशान्य भारताच्या दक्षिण भागात देखील मान्सून डेरेदाखल होईल, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, केरळमध्ये पावसाचा जोर वाढला असून आता हळूहळू मान्सून वारे पुढे सरकतील असा अंदाज आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, येत्या 48 तासात त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. परिणामी पुढील 2-3 दिवस कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर मेघगर्जनेसह व वादळी वाऱयासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग

रविवारी संध्याकाळी आकाश भरून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी अनेकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही समोर आले. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर पावसाची चातकासारखी वाट बघत होते. यंदा पुण्याचे तापमान चाळीशीपार गेले होते. त्यामुळे पुणेकर उकाडय़ाने हैराण झाले असतानाच पावसाने दिलासा मिळाला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पडणाऱया पावसामुळे काही ठिकाणांचा वीजप्रवाहही काहीकाळ खंडित झाला.