|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नवी एलएचबी गाडी उद्घाटनाशिवाय रवाना

नवी एलएचबी गाडी उद्घाटनाशिवाय रवाना 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण रेल्वेची लाल करडय़ा रंगाची नविन LHB कोचची मांडवी एक्सप्रेस गाडी  सोमवारी  उद्घाटनाशिवाय मडगाव येथून मान्सून वेळापत्रकानुसार सकाळी 8.30 वाजता मुंबईसाठी रवाना झाली. रेल्वे प्रशासनाचे काही मोजकेच अधिकारी फलाट सोडणाऱया गाडीचे फोटो किंवा व्हिडिओ काढत होते. निळ्या रंगाची गाडी सवयीची झालेल्या प्रवाशांचा नव्या स्वरूपाच्या या गाडीमुळे गोंधळ झाला. एक जनरल डब्बा रद्द केल्याने आणि सर्व डब्यांची लांबी जास्त असल्याने फलाटावर असलेला आकडा आणि समोर आलेला डबा यात ताळमेळ नसल्याने प्रवाशांची थोडी धावपळ झाली. 

ही नवी गाडी प्रवाशांना जास्त सुविधा देणारी असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाची भावना आहे. 2 जनरल डबे कमी केल्याने काही प्रवाशांनी स्लीपर कोचमध्ये प्रवेश केला. नव्या गाडीची पहिली फेरी असल्यामुळे पॅण्ट्रीकार पूर्ण तयार नव्हती. परिणामी ‘फुड कोर्ट’ हणून प्रसिद्ध असलेल्या या गाडीत सुरूवातीपासून खाद्यपदार्थ उपलब्ध नव्हते. निळ्या रंगाच्या मांडवी एक्सप्रेसमध्ये असणारी खाद्यपदार्थांची रेलचेल या नव्या लाल-करडय़ा मांडवीत नव्हती. 

दरवाजाची रूंदी जास्त असल्याने आणि टॉयलेट यंत्रणेत बदल असल्याने गाडीत चढणे व उतरणे सोईचे झाले आहे. तसेच अग्नीशमन यंत्रणा सर्व डब्यात असल्याने सुरक्षा वाढली आहे. 

प्रा. बोडस यावेळीही पहिले प्रवासी

कोकण रेल्वेवर उद्घाटनाच्या गाडीने प्रवास करण्याची परंपरा कायम राखत कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील पहिले प्रवासी प्रा. उदय बोडस यानी उद्घाटनाचा मडगाव- रत्नागिरी प्रवास केला. हा त्यांचा 21 वा उद्घाटनाचा प्रवास आहे.