|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिक्षण क्षेत्रात कोकणचेच नाणे खणखणीत

शिक्षण क्षेत्रात कोकणचेच नाणे खणखणीत 

कोकणातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दहावी व बारावी परीक्षेत कोकणचाच झेंडा फडकवला आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्हय़ाने नेहमीप्रमाणे सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाने सलग आठ वर्षे बाजी मारली आणि राज्यात गौरवास्पद कामगिरी केली आहे.

 

कोकण बोर्डातील विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी बजावत राज्यात सलग आठवेळा अव्वल येण्याचा मान मिळवला आणि शैक्षणिक क्षेत्रात कोकणचे नाणे खणखणीत वाजणारे असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुकच आहे. मात्र शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्येही असेच घवघवीत यश मिळविले पाहिजे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी व दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कोकणातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दहावी व बारावी परीक्षेत कोकणचाच झेंडा फडकवला आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्हय़ाने नेहमीप्रमाणे सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाने सलग आठ वर्षे बाजी मारली. त्यामध्ये एकूण निकाल त्याचबरोबर मुलींचा निकाल या दोन्ही बाजूंनी राज्यात गौरवास्पद कामगिरी केली आहे.

कोकण परीक्षा बोर्ड स्थापन होण्यापूर्वी पुणे व कोल्हापूर बोर्डाला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा जोडलेला होता. परंतु, स्वतंत्रपणे कोकण बोर्ड स्थापन व्हावे, अशी मागणी होऊ लागल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी ही मागणी मंजूर केली. त्यानंतर स्वतंत्रपणे परीक्षा बोर्ड स्थापन झाल्यावर पहिल्या वर्षापासून 2019 पर्यंत सलग आठ वर्षे कोकण बोर्ड संपूर्ण राज्यात आघाडीवर राहिला आहे. या वर्षी बारावी परीक्षेचा कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक 93.23… लागला असून सिंधुदुर्गचा 94.29… तर रत्नागिरीचा 92.62… लागला आहे. दहावी परीक्षेतही कोकण विभागच अव्वल राहिला असून दहावीचा निकाल 88.38… लागला आहे. तसेच सिंधुदुर्गचा निकाल 91.24… तर रत्नागिरीचा 88… लागला आहे.

 सलग आठ वर्षे दहावी व बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात मारलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. सलग आठ वर्षे यश मिळवणे तसे सोपे नाही. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे.  साहित्यिक, कवी आणि विविध क्षेत्रात चमकणारे लोक कोकणातीलच अधिक आहेत. या ठिकाणच्या सुसज्ज शाळा, शिक्षक वर्गाकडून दिले जाणारे शिक्षण नेहमीच सर्वांपेक्षा उजवे असते. दहावी व बारावीची परीक्षा ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची असली, तरी विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कमपणे रचलेला असतो. म्हणूनच मग विद्यार्थी पुढे जाऊन यशस्वी होताना दिसतात.

कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात शिक्षण प्रवाहापासून बाजूला राहणारी मुले सापडत नाहीत. असा शंभर टक्के साक्षर होणारा पहिला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथे शिक्षणाला फार महत्त्व दिले जाते. इतर जिल्हय़ातून आलेली मुलेसुद्धा या जिल्हय़ात चमकून जातात. त्यामुळे शिक्षकांकडून दिले जाणारे ज्ञान चांगल्या दर्जाचे असते, हे स्पष्टच होते. प्राथमिक शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने दिले जाते. विविध शालेय उपक्रमही राबविले जातात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने तर प्रज्ञाशोध (टॅलेन्ट सर्च) परीक्षा सुरू करून बुद्धिमत्ता वाढविण्याचे काम केले आहे. विविध शिक्षक संघटनाही यात मागे नसतात. शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेऊन अभ्यासक्रमाची उजळणी घेत असतात. सर्व स्तरातून होणाऱया प्रयत्नांमुळेच शैक्षणिक प्रगती होत असते. त्यामुळे आज दहावी व बारावीच्या परीक्षेत कोकणातील विद्यार्थी चमकत असतात. मात्र एवढे यश मिळवत असताना हे विद्यार्थी पुढे काय करतात किंवा विविध क्षेत्रात यश मिळवतात का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवूनही पुढे मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा फारसा टिकाव लागत नसल्याने कोकणातील विद्यार्थी उच्च पदस्थ नोकऱयांमध्ये दिसत नाहीत, हे वास्तव आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांचा विचार केला, तर शासकीय सेवेतील नोकऱयांमध्ये जास्तीत जास्त भरणा हा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील लोकांचा दिसून येतो. नोकरी मिळण्यासाठी वशिलेबाजी चालते, असा आरोप केला जातो. परंतु, तो संशोधनाचा विषय ठरेल. मात्र इतर जिल्हय़ातून नोकर भरतीसाठी येणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून येतात, हे तेवढेच खरे आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर यासारख्या जिल्हय़ांमध्ये प्रत्येक तालुका स्तरावर एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्रे आहेत. काही ठिकाणी तर माध्यमिक शाळानिहाय एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आहेत. त्यामुळे त्या जिल्हय़ातील विद्यार्थी सातवी-आठवीनंतर शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करतात. म्हणूनच त्या जिल्हय़ातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविताना दिसतात. अशा पद्धतीने कोकणातही स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण केंद्रे सुरू केली गेली, तर कोकणातील विद्यार्थीही शैक्षणिक प्रगतीबरोबरच स्पर्धा परीक्षेमध्येही निश्चित यश मिळवतील.

 दोन्ही जिल्हय़ातून आयएएस किंवा आयपीएस अधिकारी म्हणून एखाद-दुसराच झालेला पहायला मिळेल. वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारीही फारच कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे मिळतील. एवढेच काय, तर शिपाई, लिपिक भरतीतही सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील स्थानिक कमी दिसून येतील. हे चित्र बदलायचे असेल, तर नुसते दहावी व बारावीमध्ये यश मिळवून चालणार नाही. स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळवावे लागणार आहे. येथील राजकीय इच्छाशक्तीही कमी पडत आहे. येथील नेतेमंडळींनी अनेकवेळा स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करणार असल्याचे जाहीर केले. परंतु, प्रत्यक्षात काही ती सुरू झाली नाहीत. एक/दोनवेळा फक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग झाले. परंतु, त्याचा काही उपयोग होणार नाही. वर्षभर स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू ठेवून मार्गदर्शन केले पाहिजे. दहावी व बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी जशी मेहनत घेतली जाते, तशीच मेहनत स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी घेतली पाहिजे. तरच राज्यात सर्वाधिक दहावी-बारावीचा निकाल लावणारा कोकण विभाग इतर क्षेत्रातही चमकेल.

संदीप गावडे