|Friday, August 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » योद्धा क्रिकेटवीर

योद्धा क्रिकेटवीर 

टीम इंडियाचा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने जागतिक क्रिकेटमधील एका लढाऊ पर्वाचाच अस्त झाला आहे. आज अवघे जग विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेत असताना क्रिकटचे मैदान गाजवणारा एक योद्धा खेळाला कायमचा अलविदा करतो, ही बाब प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी नक्कीच गहिवरून टाकणारी म्हणता येईल. अर्थात भविष्यात युवराज मैदानात दिसणार नसला, तरी त्याचे नाव क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच ‘सिक्सर किंग’ म्हणून झळकत राहणार आहे. युवीची शैली एकदम सहजसुंदर. त्याला उत्तम पदलालित्याची जोड लाभलेली. त्यामुळे त्याच्या भात्यात अनेकविध फटक्यांची रेलचेल असे. गॅप काढण्यात तो जितका वाकबगार, तितकाच उत्तुंग षटकार खेचण्यातही तरबेज. त्याने 2007 च्या ट्वेंटी 20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ठोकलेले सहा टोलेजंग षटकार कोण विसरेल? हा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे. वास्तविक युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासून त्याच्यातील गुणवत्तेची चुणूक खऱया अर्थाने सर्वांना पहायला मिळाली. त्यानंतर भारतीय संघात दाखल झालेला हा हिरा कधी भारतीय क्रिकेटचा तारणहार झाला, हे कुणालाच कळले नसेल. 2000 मध्ये ऑस्ट्रेलियासारख्या तगडय़ा संघाविरोधात 84 धावांची दणकेबाज खेळी करीत आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे त्याने दाखवून दिले. तर 2002 मध्ये इंग्लंडमधील नॅटवेस्ट स्पर्धेपासून युवराजने क्रिकेटमध्ये आपले स्वतंत्र साम्राज्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने महंमद कैफसोबत साकारलेला विजयाचा कैफ आजही अनेकांच्या स्मरणात असेल. 2004 मधील कांगारूंविरूद्धचे तडाखेबाज शतक, 2006 मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत एक शतक व दोन अर्धशतकांसह सातत्यपूर्ण खेळ करीत दिलेले योगदान हेदेखील त्याच्या कारकिर्दीतील काही महत्त्वपूर्ण टप्पे मानावे लागतील. एकीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखरावर असलेल्या युवीला कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी मात्र काहीसा संघर्ष करावा लागला. 2007 मध्ये पाकविरूद्धच्या सामन्यात 169 धावांची खेळी करीत त्याने आपला दर्जा दाखवून दिला खरा. तरीही त्याच्यातील नैसर्गिक गुणवत्ता वा क्षमता पाहता कसोटीमध्ये त्याला फारसे यश मिळविता आले नाही, हे मान्य करायला हवे. युवीने 40 कसोटी सामन्यात 33.92 च्या सरासरीने केलेल्या 1900 धावा नोंदविल्या आहेत. त्याच्यासारखा दर्जेदार खेळाडू केवळ दोन आकडीच कसोटी सामने खेळतो, ही काहीसे आश्चर्यकारकच. 2011 ची विश्वचषक स्पर्धा हा मात्र युवीच्या आयुष्यातील मैलाचा दगड मानता येईल. या स्पर्धेत एक शतक व चार अर्धशतकांसह 90.50 सरासरीने युवीने तब्बल 362 धावा कुटल्या. इतकेच नव्हे, तर 15 बळी मिळवत गोलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली. हे पाहता विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या विजयाचा मुख्य शिल्पकार युवराजसिंग हाच ठरतो, हे सारेच जाणतात. धुवाँवार फलंदाज, उपयुक्त गोलंदाज ही पंजाबच्या पुत्तरची प्रमुख ओळख असली, तरी अफलातून क्षेत्ररक्षक म्हणूनही तो कायम ध्यानात राहील. युवी, कैफ यांचा संघात समावेश झाल्यापासून एरवी ढेपाळणारे भारतीय क्षेत्ररक्षण इतके सुधारले, की त्याची दखल इतरांना घेणेही भाग पडले. सूर मारून अवघडातील अवघड झेल घेण्याचे कसब असलेल्या या फिल्डिंगच्या बादशहाने आपल्या कारकिर्दीत किती धावा वाचवल्या, याचे रेकॉर्ड कदाचित मिळणार नाही. परंतु, या माध्यमातून स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याच्या आपल्या वृत्तीतून त्याने भारतीय क्रिकेटमधील अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा दिली, हे निश्चित. गोलंदाजांवर दहशत गाजवणाऱया या सिक्सर किंगला यशाबरोबरच संकटांचे चटकेही सोसावे लागले. कारकीर्द ऐन भरात असताना कर्करोगासारख्या आजाराने त्याला कोंडीत पकडले. मात्र, रोमारोमात लढाऊपणा भिनलेल्या या महान खेळाडूने यातूनही गॅप काढत या संकटावरही यशस्वीपणे मात केली. त्याने ज्या धैर्याने या आजारावर मात करीत पुनरागमन केले, ते पाहता केवळ क्रीडापटूंसाठीच नव्हे, तर सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी त्याचा हा संघर्ष प्रेरणादायी मानता येईल. 2014 च्या टी 20 विश्वकरंडक स्पर्धेत मात्र त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतरही त्याचा बॅडपॅच कायम राहिल्याने युवी संपला, अशी धारणा झाली. मात्र, 2017 मध्ये इंग्लंडविरूद्ध 122 चेंडूत 134 धावांची झंझावाती खेळी करीत त्याने आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. नंतर, मात्र फिटनेस वा फॉर्मअभावी त्याला संघाबाहेर रहावे लागले. आता युवराज संघात नसला, तरी त्याची उणीव मात्र कायम जाणवणारच राहणार आहे. निवृत्ती स्वीकारताना आपल्या आयुष्यात यशापेक्षा अपयशाचे क्षण अधिक आले, पण आपण कधी हार मानली नाही, असे युवी म्हणतो. युवराजने स्वत:ला अपयशी संबोधले असले, तरी ते मात्र त्याच्यासंदर्भात अन्यायकारक म्हणता येईल. ज्या पट्टय़ाने भारताला दोन वर्ल्ड कप मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, अनेक स्पर्धांमध्ये मॅच विनिंग कामगिरी केली, त्याला अपयशी कसे संबोधता येईल? फॉर्म इज टेंपररी ऍन्ड क्लास इज परमनंट, असे आपण नेहमी म्हणतो. प्रत्येक खेळाडूच्या जीवनात चढउतार हे असतात. जगातला कोणताही खेळाडू बॅडपॅचमधून सुटलेला नाही. म्हणूनच एका वळणावरील खराब कामगिरीने युवीचे तेजोवलय धूसर होत नाही. उलट उत्तुंग खेळीबरोबरच त्याचा संघर्ष, त्याची जिद्द आठवली, की तो किती महान खेळाडू आहे, याची प्रचीती येते. सगळेच कधीतरी निवृत्त होतात. पण युवराजसारखा लढवय्या, झुंजार क्रिकेटवीर जेव्हा अलविदा करतो, तेव्हा डोळेही पाणवतात नि मनही गलबलते, ते याचमुळे. आज युवराज पर्वाचा अस्त झाला असला, तरी त्याचे क्रिकेट कायमच हृदयात राहील. या योद्धय़ा क्रिकेटपटूला सलाम.