|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » समुद्र खवळला, वादळी वारे

समुद्र खवळला, वादळी वारे 

तीन नंबरचा बावटा : खंडित वीज पुरवठय़ाने नागरिक हैराण

प्रतिनिधी / मालवण:

पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळामुळे जिह्याच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱयांचा जोर वाढला आहे. समुद्र खवळला असून पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून बंदर विभागाच्यावतीने बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.

मान्सूनला मिळालेली वाऱयांची साथ चक्रीवादळात मिसळल्याने मान्सूनचे आगमन आणखी लांबण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली असताना पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मान्सूनच्या आगमनावर झाला असल्याचे दिसून येत आहे. गेले दोन दिवस जिल्हय़ात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सोमवारी काही ठिकाणी पावसाचा किरकोळ शिडकावा झाला. सोमवारी सायंकाळपासून किनारपट्टी भागात वादळी वाऱयांचा जोर वाढल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळच्या सत्रात समुद्र मोठय़ा प्रमाणात खवळला असून मोठ-मोठय़ा लाटांचा मारा किनाऱयावर होत होता. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे दुपारी पावसाचा शिडकावा झाला. जिल्हय़ात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

समुद्रातही बदल जाणवू लागले!

यासंदर्भात मच्छीमारांशी संपर्क साधला असता मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिणेकडील वाऱयांचा जोर आवश्यक आहे. मात्र, सध्या समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत आहेत. हे मान्सूला पोषक नाहीत. मान्सूनला ज्या वाऱयाची आवश्यकता होते ते वारे या चक्रीवादळात मिसळले गेल्याने मान्सूनचे आगमन आणखी लांबणार असल्याची चिन्हे असल्याची माहिती जाणकार मच्छीमारांनी दिली. समुद्रातील चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर जाणवत असून वादळी वाऱयांमुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे.

पर्यटन व्यवसाय थंडावला

वादळी वाऱयामुळे समुद्रातील बदल जाणवू लागल्याने पर्यटन हंगाम पूर्णपणे बंद झालेला आहे. पर्यटकही शहरातून माघारी परतू लागल्याचे चित्र आहे. शहर आणि ग्रामीण भागात खंडीत वीज पुरवठय़ाच्या तक्रारी वारंवार होत असल्याने पर्यटनालाही याचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला. शहराचे वीज उपकेंद्र अद्याप सुरू झालेले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समुद्रातील पर्यटन व्यवसाय बंद झाल्याने होडय़ा किनाऱयावर काढल्या जात आहेत.

बाजारपेठ धोक्याच्या छायेत

मालवण बाजारपेठेतील एका वीज खांबावर वडाच्या झाडाच्या पारंब्या आल्या असून वादळी वाऱयामुळे अनेकदा स्पार्किंग होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनी आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडे व्यापारी संघाकडून आणि व्यापारी बांधवांनी तक्रार करुनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सदरच्या वीज खांबामुळे बाजारपेठ रात्रीच्यावेळी धोका निर्माण होण्याची भीती आहे. वीज वितरण कंपनी अगर पालिका प्रशासनाने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.