|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » चीनच्या यांगयीकडून आनंद पराभूत

चीनच्या यांगयीकडून आनंद पराभूत 

वृत्तसंस्था/ स्टेव्हॅनगेर

नॉर्वेमध्ये सुरू असलेल्या अल्टीबॉक्स नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीतील लढतीत चीनचा ग्रॅण्डमास्टर यु यांगयीकडून भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदला पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे आनंदची गेल्या तीन सामन्यातील विजयी घोडदौड रोखली.

सहाव्या फेरीतील झालेल्या सामन्यात चीनच्या यांगयीने आनंदचा 48 व्या चालीत पराभव केला. या लढतीत यांगयीने आपला बचाव भक्कम करत आनंदला अडचणीत आणले. आनंदकडून महत्त्वाच्या क्षणी चुकीच्या चाली झाल्याने त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सहाव्या फेरीअखेर नॉर्वेचा ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसन 9.5 गुणांसह आघाडीवर आहे.

चीनचा यांगयी 8 गुणांसह दुसऱया तर अर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर ऍरोनियन 7.5 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. अमेरिकेचा वेस्ले सो 6.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. विश्वनाथन आनंद आणि लिरेन यांनी प्रत्येकी समान 5.5 गुणांसह संयुक्त पाचवे स्थान मिळविले आहे. अझरबेजानचा मॅमेडॅरोव्ह सातव्या स्थानावर तर अमेरिकेचा केरूना आठव्या स्थानावर आहे. लेग्रेव्ह 4.5 गुणांसह नवव्या आणि ग्रिश्चूक 3 गुणांसह 10 व्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.

 दहा स्पर्धकांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीन खेळविली जात आहे.