|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रिझल्ट ओरिएन्टेड काम पाहिजे : उदयनराजे

रिझल्ट ओरिएन्टेड काम पाहिजे : उदयनराजे 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा आणि नगर जिल्हय़ातील औद्योगिक वसाहती सुमारे 1974 च्या सुमारास सुरु झाल्या. नगर जिल्हय़ातील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उद्योजकांना संरक्षण देण्याची हमी दिल्याने नगरच्या एमआयडीसीचा विकास झाला, परंतु तत्कालीन सातारच्या लोकप्रतिनिधींची अनास्था आणि नरो व कुंजरोवा अशी भुमिका यामुळे सातारच्या एमआयडीसीचा म्हणावा तसा विकास झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. खापर मात्र तिसऱयावरच फोडले जाते. ज्या लोकांना इंन्डस्ट्रीयल प्लॉट दिले आहेत व जे प्लॉट पडून आहेत त्या जागा तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करा. इंडस्ट्री सुरु करण्यास इच्छुक असलेल्यांना सदरच्या जागा द्या. आम्हाला रिझल्ट ओरिएन्टेड काम पाहिजे, अश्या प्रकारच्या सूचना सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार  उदयनराजे भोसले यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱयांना दिल्या.

खासदारउदयनराजे भोसले यांनी मंगळवारी एमआयडीसी कार्यालयास भेट देवून तेथील अधिकाऱयांशी एमआयडीसीच्या विकासाबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी विक्रांत चव्हाण, प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर, उपअभियंता सुकुमार पोवार, क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, सहा.अभियंता विकास गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

वेल स्टार्ट इज हाफ डन म्हणतात त्याप्रमाणे येथील एमआयडीसीची सुरुवातच निरुत्साही लोकप्रतिनिधींमुळे चांगली झाली नाही. त्यामुळेच आजची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून सातारच्या जुन्या आणि नव्या एमआयडीसीकरीता जागा किती घेतली गेली. ज्या जागा घेतल्या त्याचा मूळ मालकांना मोबदला मिळाला का, सदरची जागा किती व्यक्तींना रितसर प्रदान केली, कोणत्या कारणाकरीता दिली, आज त्या प्लॉटवर नेमका कोणता उद्योग सुरु आहे, त्यावेळच्या व नंतर सुधारित केलेल्या ले-आउट प्रमाणे रेसिडेन्सियल झोन, इंन्डस्ट्रीयल झोन, रिप्रेशमेंट झोन किती व कोणकोणते होते याबाबतची माहिती तसेच इंन्डस्ट्रीयल झोनकरीता सातारा जिल्हय़ात किती जागा आरक्षित करण्यात आली आहे, याबाबतची माहिती दोन-तीन दिवसांत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या. तसेच ज्यांनी इंडस्ट्रीयल प्लॉट घेवून हौसिंग स्कीम्स राबवल्या जात असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र स्कूटरची 60 एकर आणि शासकीय दूध डेअरीची सुमारे 40 एकर अशी मिळून 100 एकर जागा बिनवापराची आहे. त्याबाबत एमआयडीसी कार्यालयाने योग्य ती माहिती द्यावी. रिजनल ऑफिसर कोल्हापूरसह संबंधित प्लॉटधारक यांची 22 जूनला बैठक बोलावण्यात यावी असेही त्यांनी सूचित केले. 

यावेळी उपस्थित टपरीचालक महिलांनी आमच्या टपऱया हलवल्या तर आम्ही जगायचं कसं, गेल्या आठ दिवसांपासून आमची मुलं-बाळं उपाशी आहेत, आमच्यावर अन्याय करु नका अशी विनंती केली,

 विक्रांत चव्हाण, प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी माजी सभापती सुनील काटकर, युवा नेते संग्राम बर्गे, बाळासाहेब खरात, रॉबर्ट, शफी इनामदार, धनगरवाडीचे सरपंच तानाजी खरात आदी उपस्थित होते.