|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजाराने दर्शविली उठावदार तेजी

शेअर बाजाराने दर्शविली उठावदार तेजी 

सेन्सेक्स 166 अंकांनी वाढून बंद झाला तर निफ्टीत तेजी कायम

वृत्तसंस्था/ मुंबई

चांगल्या वैश्विक संकेतांमुळे बाजारात उठावदार तेजी पाहायला मिळाली. निफ्टी सलग तिसऱया दिवशी तेजीत कायम राहिला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स आणि टीसीएसच्या शेअर्सने बाजाराला सावरले. व्यापारात सेन्सेक्स सुमारे 166 अंकांच्या वाढीने बंद होण्यात यशस्वी झाला. तर निफ्टीत 43 अंकांची वाढ होत 11966 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. 

व्यवसायातील सेन्सेक्सच्या 30 पैकी 24 शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळाली. तर निफ्टीच्या 50 पैकी 32 शेअर्समध्ये खरेदी झाली होती. पंजाब नॅशनल बँकेशी बँक ऑफ महाराष्ट्र आणि अलाहाबाद बँक विलिनीकरण करण्याच्या वृत्तामुळे पीएसयू बँक शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.69 टक्क्यांनी वाढत बंद झाला. तर खासगी बँक निर्देशांक 0.79 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. बँक निफ्टीच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. यामुळे बँक निफ्टी 0.75 टक्क्यांनी वाढत 31265 च्या स्तरावर बंद झाला.  

दिग्गज समभागासह मिड आणि स्मॉल पॅप समभागात तेजी पाहायला मिळाली. बीएसईचा मिड पॅप निर्देशांक 0.79 टक्के वाढत 15040.87 च्या स्तरावर बंद झाला तर स्मॉल पॅप निर्देशांक 0.24 टक्क्यांनी वाढून 14618.97 च्या स्तरावर बंद झाला. तेल आणि वायू समभागात सर्वात जास्त खरेदी पाहायला मिळाली.

फार्मा आणि एफएमसीजी समभाग वगळता निफ्टीच्या सर्व क्षेत्रातील निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टीचा फार्मा निर्देशांक 0.04 टक्के आणि एफएमसीजी निर्देशांक 0.16 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

बाजाराच्या शेवटी बीएसईच्या 30 समभागाचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 165.94 अंकांनी म्हणजे 0.42 टक्क्यांनी वाढीसह 39950.46 च्या स्तरावर बंद झाला. तर एनएसईच्या 50 समभागाचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 42.90 अंकांनी म्हणजे 0.36 टक्क्यांनी वाढ होत 11965.60 च्या स्तरावर बंद झाला.