|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात ‘मान्सूनपूर्व’ची जोरदार बॅटींग

जिल्हय़ात ‘मान्सूनपूर्व’ची जोरदार बॅटींग 

वायू चक्रीवादळाचा परिणाम 24 तासात वाऱयासह पावसाचा अंदाज

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपारनंतर मान्सूनपुर्व पावसाने जिल्हय़ात जोरदार बॅटींग केली. उन्हाच्या झळांनी त्रस्त रत्नागिरीकरांना यामुळे अल्पसा दिलासा मिळाला. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. समुद्राला उधाण येवून उंच लाटा उसळणार असल्याने नागरिकांनी समुद्राच्या जवळ जावू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाच्या आगमनाबरोबरच जिल्हय़ात वीजेचा लपंडाव सुरू होता, तसेच मंडणगड तालुक्यातील गोठे येथे वादळामुळे ग्रामपंचायतीची छप्पर उडून गेल्याची घटना घडली.

केरळमध्ये दाखल व्हायला झालेला उशीर व त्यांनतरचे वायू चक्रीवादळ यामुळे कोकणात मान्सूनचे आगमन लांबले आहे. मात्र वायू वादळामुळे मान्सूनपुर्व पावसाने जिल्हयात दमदार हजेरी लावली. चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्हय़ात तडाखा बसलेला नसला तरी  समुद्राला उधाण आले आहे. रत्नागिरीत लाटांच्या वेग एवढृ होता की समुद्राचे पाणी थेट मांडवी प्रवेशव्दारापर्यंत घुसले होते. मंगळवार रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. बुधवारी सकाळी उन-पावसाच्या खेळ सुरू होता, मात्र 2 च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला.

राजापूर-गुहागरात सर्वाधिक

रत्नागिरी जिल्हय़ात बुधवारी राजापूर आणि गुहागर मध्ये सर्वाधिक पाऊस पडला. राजापूरमध्ये 23 मिमि तर गुहागर मध्ये 19 मिमि पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 12 जून रोजी रत्नागिरी जिल्हय़ात सरासरी 406 मिमि इतका तुफान पाऊस कोसळला होता यंदा केवळ 19.33 सरासरी मिमि पाऊस पडला आहे. रत्नागिरीत बुधवारी मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली असून पुढील 24 तास पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 20 जूनपर्यंत हा पाऊस सुरूच राहणार असून 21 जूनपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदा पाऊस लांबल्याने रत्नागिरीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे मात्र आणखी दोन दिवस चांगला पाऊस झाल्यास ही टंचाई दूर होऊ शकते. वायू चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग याठिकाणी वेगाने वारे वाहत आहेत. वायू चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले असले तरी कोकणातही 15 जूनपर्यंत या वादळाचा अल्प प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 

राजापूरात दोन दिवस वीज गायब

 दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वाऱयामुळे पोल कोसळल्याने वा विजवाहीन्या तुटल्याने राजापूर शहरासह लगतच्या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. 

गोठे-मंडणगड ग्रा.पं.चे छप्पर उडाले

मंडणगड तालुक्यातील गोठे ग्रामपंचायतीला वायू चक्रीवादळाचा तडाखा बसला. दुपारी 12.30 मच्या सुमारास सुटलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयाने या ग्रामपांयतीचे संपूर्ण छप्पर उडून गेले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही अथवा कागदपत्रांचेही नुकसान झाले नाही. ग्रामपंचायतीची कागदपत्रे तातडीने नजीकच्या अंगणवाडीच्या इमारतीत सुरक्षित हलवण्यात आली असून तेथून कामकाजही सुरू ठेवण्यात आले आहे. तालुक्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते व लहान-मोठय़ा पावसाच्या सरी बरसत होत्या. किनारपट्टीच्या भागात वाऱयाचा वेगही वाढलेला होता.

 

आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी

जिल्हय़ात सध्याचे वायू चक्रीवादळ व त्यानंतरही पावसाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज आहे. समुद्रात काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यास नागरिकांनी पोलीस अथवा आपत्ती व्यवस्थापनाला त्वरीत कळवावे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.