|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उमरे बाईतवाडीत घर भस्मसात

उमरे बाईतवाडीत घर भस्मसात 

जमिनीच्या वादातून शेजाऱयानेच आग लावल्याचा संशय

वार्ताहर/ संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील उमरे बाईतवाडी येथे संदेश मनोहर सावंत यांचे राहते घर  मध्यरात्री जळून भस्मसात झाले. जमिनीच्या वादातून शेजाऱयानेच घराला आग लावल्याचा संशय घर मालकाने व्यक्त केला आहे. त्यानुसार संशयितावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उमरे बाईतवाडी येथील संदेश सावंत यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीनुसार सावंत यांचे अनेक वर्षापूर्वीचे जुने घर गावात आहे. दोन दिवसापूर्वी ते मुंबईला गेले होते. मंगळवारी रात्री 1 च्या सुमारास त्यांच्या घराला  संशयित व्यक्तीने दर्शनी दरवाजाच्या बाजूला रॉकेल ओतून आग लावली. या दरम्यान पावसाने ओढ दिल्याने लाकडी सामानाने पेट घेतला व काहीवेळातच घर जळून भस्मसात झाले.

वाडीतच राहणाऱया एका व्यक्तीबरोबर सावंत यांचा जमिनीचा वाद आहे. सावंत यांची गहाण ठेवलेली जमिन नावावर करुन देण्याचा तगादा या संशयिताने लावला होता. मात्र संदेश सावंत यांनी नकार दिल्याने वाद झाला होता. त्यातूनच  संशयिताने दरवाजाजवळ रॉकेल ओतून आग लावून नुकसान केल्याचा संशय सावंत यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.

सावंत यांच्या फिर्यादीवरून संशयित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.