|Friday, August 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दुर्घटनास्थळी पोहोचले बचावपथक

दुर्घटनास्थळी पोहोचले बचावपथक 

एएन-32 विमानाचे अवशेष सापडले : पथकात गरुड कमांडो, सैनिक, गिर्यारोहक सामील

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वायुदलाचे बेपत्ता झालेले विमान एएन-32 चे अवशेष अरुणाचलच्या सियांग जिल्हय़ाच्या जंगलात आढळून आले आहेत. अवशेष सापडल्यावर वायुदलाने दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 15 जणांचे पथक दुर्घटनास्थळी उतरविले आहे. या पथकात सैन्य, वायुसैनिक आणि गिर्यारोहकांचा समावेश आहे. 12 हजार फुटांच्या उंचीवरील जंगलात विमानातील सदस्यांचा शोध या पथकाकडून घेतला जाणार आहे.

वायुदलाने शोधमोहिमेदरम्यान मंगळवारी 3 जूनपासून बेपत्ता असलेल्या एएन-32 चे अवशेष सापडल्याची पुष्टी दिली होती. एमआय-17 हेलिकॉप्टरला विमानाचे अवशेष दिसून आले होते. एएन-32 विमानाने 3 जून रोजी आसाममधील वायुतळावरून उड्डाण केले होते. बेपत्ता झालेल्या या विमानातून 13 जण प्रवास करत होते.

वायुदलाने सुखोई-30, सी130 जे सुपर हर्क्यूलिस, पी8आय विमान, ड्रोन आणि उपग्रहांच्या मदतीने विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेत वायुदलासह नौदल, सैन्य, गुप्तचर यंत्रणा, आयटीबीपी आणि पोलिसांचे जवान सामील होते.  

उड्डाणासाठी प्रतिकूल क्षेत्र

अरुणाचलच्या संबंधित भागात अनेक अडथळे (टर्ब्युलंस) असल्याचे समोर आले आहे. 140 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने तेथे उड्डाण करणे अवघड ठरते. दूरपर्यंत जंगल असल्याने आणि नागरी वस्ती नसल्याने बेपत्ता विमानांचा शोध घेणे अत्यंत कठिण ठरते. यापूर्वीही अरुणाचलमधील टेकडय़ांवर दुसऱया महायुद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या विमानांचे अवशेष सापडले आहेत. फेब्रुवारीमध्ये पूर्व अरुणाचलच्या रोइंग जिल्हय़ात 75 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका विमानाचे अवशेष आढळले होते. हे अमेरिकेच्या वायुदलाचे विमान होते. दुसऱया महायुद्धादरम्यान चीनमध्ये जपानी सैन्याच्या विरोधातील लढाईला मदत करण्यासाठी या विमानाने आसाममधून उड्डाण केले होते.