|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » औद्योगिक उत्पादनाचा सहा महिन्यांमधील उच्चांक

औद्योगिक उत्पादनाचा सहा महिन्यांमधील उच्चांक 

नवी दिल्ली

 एप्रिल 2019 मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनाने गेल्या सहा महिन्यांमधील सर्वाधिक वाढ दर्शविली आहे. उत्पादन वाढीची गती 3.4 टक्के इतकी आहे. खाण उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याने ही टक्केवारी गाठणे शक्य झाले. खाण उद्योगात एप्रिल महिन्यात 5.1 टक्के वाढ दिसून आली.

त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्रातही 6 टक्क्यांची प्रगती झाली. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात ही वाढ केवळ 2.1 टक्के होती. वीजेचा खप वाढणे हे चांगले लक्षण असून त्यामुळे उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया उत्पादन क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मात्र काहीही घट झाली आहे. गेल्या एप्रिलमध्ये या क्षेत्राचा वाढदर 4.1 होता. तो आता 2.5 टक्के झाला आहे. तथापि, महत्वाच्या औद्योगिक वस्तुंच्या उत्पादनाच्या वाढीचा वेग 5.2 टक्के असून तो गेल्या एप्रिलमध्ये केवळ 2.7 टक्के होता.

औद्योगिक उत्पादन वाढ आणि निर्यातीला अधिक प्राधान्य देण्याची योजना केंद्र सरकारने आखली असून तिचे क्रियान्वयन झाल्यानंतर उत्पादन वाढ अधिक प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी रोजगार निर्मिती व उत्पादनवाढीचे लक्ष्य गाठण्यासाठी दोन विशेष समित्यांची नियुक्ती केली आहे.

महागाई दरात वाढ…

एप्रिल 2019 मध्ये किरकोळ महागाईवाढीच्या दरात 3.4 टक्के वाढ झाली असून ती गेल्या सात महिन्यांमधील सर्वाधिक आहे, अशी माहिती देण्यात आली. उन्हाळय़ामुळे भाजीपाला, फळे व दुग्धजन्य पदार्थांचे दर महागल्याने ही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तूरडाळ व इतर डाळींचे दरही वाढले आहेत. याशिवाय इंधनाचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. गेल्या एप्रिलमध्ये महगाई वाढदर 3 टक्के इतका होता. वर्षाचा सरासरी महागाई वाढ दर 3 टक्क्यांच्या पातळीवर राखण्याचा केंद्राचा विचार आहे. तथापि, हे लक्ष्य साध्य होईल का याबद्दल साशंकताही व्यक्त होत आहे. आता साऱयांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.