|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वायएसआर काँग्रेसला महत्त्वाचे पद?

वायएसआर काँग्रेसला महत्त्वाचे पद? 

लोकसभा उपसभापतिपद मिळण्याची शक्यता : भाजपकडून प्रस्ताव

वृत्तसंस्था/  विजयवाडा

 आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव भाजपने दिल्याचे वृत्त आहे. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत 22 खासदार आहेत. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी मंगळवारी जगनमोहन यांची भेट घेत लोकसभेतील उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला आहे. जीव्हीएल राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावतीने हा प्रस्ताव दिल्याचे समजते.

जगनमोहन यांच्या पक्षाला आंध्रप्रदेशातील अल्पसंख्याक मुस्लीम आणि ख्रिश्चनांनी मोठय़ा संख्येने मतदान केले आहे. या मतपेढीचा विचार करून जगनमोहन हे प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. संसदेचे अधिवेशन 17 जूनपासून सुरू होत आहे.

15 जून रोजी होणार भेट

नीति आयोगाच्या 15 रोजी होणाऱया बैठकीत जगनमोहन सामील होणार आहेत. या बैठकीदरम्यानच त्यांची मोदींशी भेट होणार असल्याचे मानले जातेय. मागील लोकसभेत हे पद अण्णाद्रमुकच्या एम. थंबीदुराई यांना देण्यात आले होते.

शिवसेनेचा दावा

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला होता. रालोआतील दुसऱया क्रमांकाचा पक्ष असल्याने शिवसेनेलाच उपाध्यक्षपद मिळेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. पण भाजपने या पदासाठीचा प्रस्ताव वायएसआर काँग्रेसला दिल्याने शिवसेनेच्या मागणीबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.