|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » सारी धडपड त्या लढतीसाठी….!

सारी धडपड त्या लढतीसाठी….! 

शिखर धवन किमान तीन आठवडे खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आणि तिकडे भारतात रात्र झालेली असताना इकडे इंग्लंडमध्ये रम्य सायंकाळी भारतीय थिंक टँकमध्ये बरेच काही शिजत राहिले. धवनऐवजी कोण, हे ठरवताना व्यवस्थापनासमोर अनेक पर्याय उपलब्ध होते. पण, हे ठरवताना त्यांच्या डोळय़ासमोर एकच लढत होती. ती लढत भारत-पाक यांच्यातील अजिबात नव्हे! मग ती लढत कोणती? याच प्रश्नाचे उत्तर या सर्व चर्चेत दडले आहे!

पॅट कमिन्सचा चेंडू शिखर धवनच्या हातावर आदळला, त्याच्या हाताला दुखापत झाली. अंगठय़ाची दुखापत झाली, स्कॅनिंगमध्ये दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले, तो किमान तीन आठवडे अर्थात 21 दिवस खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आणि त्याचवेळी भारतीय संघव्यवस्थापनात बराच खल रंगत गेला. तो म्हणजे शिखर धवनऐवजी कोण?

अर्थातच, भारतीय संघव्यवस्थापनासाठी धवन अतिशय महत्त्वाचा आहे. मागील सहा वर्षात त्याने खेळलेल्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 6 शतके झळकावली आहेत आणि विशेषतः इंग्लिश भूमीत त्याचा खेळ अधिक बहरतो. याशिवाय, तो सध्याच्या भारतीय संघातील पहिल्या सहामधील एकमेव डावखुरा फलंदाज असल्याने यामुळे देखील त्याच्या उपलब्धतेचे महत्त्व और आहे.

संघात आघाडी फळीत एखाद दुसरा डावखुरा फलंदाज असतो, त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱया संघासाठी अनेक समीकरणे बदलून जात असतात. एकसारखे क्षेत्ररक्षण बदला, त्या अनुषंगाने गोलंदाजीत अनुकूल बदल करा आणि डावखुरा फलंदाज शक्य तितक्या लवकर बाद होईल, याची प्रतीक्षा करत राहा, इतकी डोकेदुखी असते. त्यातही धवनसारखा आक्रमक फलंदाजीवर भर देणारा फलंदाज असेल तर डोकेदुखीत आणखी भर. याचमुळे हा दिग्गज फलंदाज काही कालावधीसाठी बाहेर पडत असताना पर्याय अनेक उपलब्ध असले तरी त्याच्या रुपाने एक अव्वल डावखुरा फलंदाज खेळणार नाही, याची खंत वेगळीच.

 अन् म्हणूनच संघव्यवस्थापनात खल सुरु झाला की, ही जागा कशी भरुन काढायची? ती जागा धवनची म्हणून जितकी महत्त्वाची आणि त्याही पेक्षा एक डावखुरा फलंदाज म्हणून अधिक महत्त्वाची! अन् याच निकषावर एका नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी वेळ लागला नाही. तो फलंदाज म्हणजे अर्थातच ऋषभ पंत.

ऋषभ पंत मनमुराद फटकेबाजी करु शकण्याची निर्विवाद क्षमता लाभलेला अव्वल डावखुरा फलंदाज. तो संघात असल्यास धवनची डावखुऱया जागेची कमतरता दूर करु शकेल हा भारतीय थिंक टँकचा होरा आणि म्हणूनच त्याला लागलीच पाचारण केले गेले. थिंक टँकमधून आदेश निघाले आणि लगोलग ऋषभ पंत भारतातून इंग्लिश भूमीच्या दिशेने रवाना झाला!

मंडळाने यासाठी भाषाही सावध वापरली आहे. ते म्हणतात, ‘आम्ही धवनऐवजी कव्हर म्हणून ऋषभ पंतला बोलावत आहोत’. याचाच अर्थ असा की, या 21 दिवसात होणाऱया भारताच्या 3 सामन्यात ऋषभ पंत खेळेल आणि त्यानंतर कदाचित पूर्ण तंदुरुस्तीच्या निकषावर धवन संघात परत येईल.

यालाच म्हणतात गनिमी कावा!

सध्याच्या घडीला या विश्वचषकात खेळणाऱया जवळपास प्रत्येक संघाकडे पहिल्या सहामध्ये किमान एक डावखुरा फलंदाज आहे आणि धवन बाहेर गेला असला तरी भारतीय थिंक टँकला देखील प्रतिस्पर्ध्यांची हीच डोकेदुखी कमी करायची नाहीय.

प्रश्न उरेल, ऋषभ पंत धवनची जागा तितक्या तोडीने भरुन काढू शकेल का? निश्चितच काढू शकेल. कारण, पंतकडे तडफ आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडण्यासाठी लागणारा बुलंद आत्मविश्वास आहे. चेंडू आपल्या टप्प्यात आला तर त्याला सीमापार धाडण्याचे कसब त्याच्याकडे आहे आणि एकदा त्याचा धमाका सुरु झाला, तो संघव्यवस्थापनाच्या ‘प्लॅन बी’प्रमाणे कमालीचा यशस्वी झाला तर धवनचे पुनरागमनही अडचणीत येऊ शकते. अर्थात या झाल्या जर-तरच्या गोष्टी. पण, भारतीय संघव्यवस्थापन ही निवड करताना वेगळय़ाच लढतीवर लक्ष ठेवून आहे. तुम्ही म्हणाल, ती लढत भारत-पाकिस्तानची. अजिबात नाही. पण, ती लढत म्हणजे सेमीफायनलची!

संघाने पहिले दोन्ही सामने ओळीने जिंकले असल्याने थिंक टँकला आता वेध लागले आहेत ते सेमीफायनलचे. 9 किंवा 11 जुलै रोजी ती लढत होईल, त्यावेळी त्यातील विजय निश्चित करण्यासाठी आवश्यक संघबांधणीचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे आणि या दृष्टीनेच त्यांची आखणी सुरु आहे.

पहिले दोन्ही सामने जिंकल्याने भारतीय संघ उर्वरित 7 पैकी 4 सामने सहज जिंकत सेमीफायनलचे तिकीट निश्चित करेल, असा व्यवस्थापनाला, थिंक टँकला विश्वास आहे आणि याच दृष्टीने त्यांची चाणक्य नीती सुरु झाली आहे. 14 जुलै रोजी झळाळत्या विश्वचषकावर आपलाच कब्जा असावा, हे भारताचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी साखळी फेरीनंतर महत्त्वाचे पाऊल असेल ते सेमीफायनलचे.

या सेमीफायनलसाठीच भारताची यापुढील सारी धडपड रंगत जाणार आहे.

विवेक कुलकर्णी क्रीडा प्रतिनिधी