|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जोयडा येथील अभियंत्याच्या घरावर बेळगावात छापा

जोयडा येथील अभियंत्याच्या घरावर बेळगावात छापा 

एसीबीची कारवाई : रोकड, सोन्याची बिस्किटे जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

जोयडा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या बेळगाव येथील घरावर एसीबीच्या अधिकाऱयांनी बुधवारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. बेळगाव, दांडेली व जोयडा येथे एकाच वेळी तपासणी करण्यात आली आहे.

जोयडा येथील साहाय्यक कार्यकारी अभियंते उदय छब्बी यांच्या कृषी कॉलनी, भाग्यनगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. एसीबीचे उपअधीक्षक गिरीश, पोलीस निरीक्षक एस. आर. कट्टीमनी, विश्वनाथ कब्बुरी, रमेश हानापूर यांच्यासह बेळगाव व कारवार येथील अधिकाऱयांनी छापा टाकला.

बेळगावबरोबरच दांडेली येथील उदय यांची आई राहत असलेल्या घरी व जोयडा येथील कार्यालयातही तपासणी करण्यात आली आहे. यासंबंधी बुधवारी रात्री एसीबीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता भाग्यनगर येथील एका घराबरोबरच बेळगाव येथे आणखी एक फ्लॅट आढळून आला आहे, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईत 11 लाख रुपये रोख रक्कम, दोन सोन्याची बिस्किटेही जप्त करण्यात आली आहेत. ही बिस्किटे प्रत्येकी 100 ग्रॅमची असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. बेळगाव व कारवार येथील एसीबीच्या अधिकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या अधिकाऱयाने जमविलेली माया किती, हे स्पष्ट होणार आहे.