|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तापमान वाढीचे संकट

तापमान वाढीचे संकट 

हवामान बदल आणि तापमान वाढीबाबत जगभर शास्त्रज्ञ आणि संशोधकात मतभेद असले तरी आज हे संकट तीव्र होत चाललेले असून त्याचे चटके सजीवमात्रांना सोसण्याची पाळी आलेली आहे. महाराष्ट्रातल्या चंद्रपूरच्या तापमानाने उच्चांक गाठत तेथील माणसांबरोबर जनावरांचे जीवनही त्यामुळे उद्भवणाऱया दुष्परिणामांचे चटके सोसत आहे. वाळवंटाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया राजस्थानात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उष्म्याचा दाह असहय़कारक होऊ लागलेला आहे. जगभरातल्या लोकांना आज हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे उद्भवणाऱया संकटांची चिंता लागून राहिलेली आहे. तापमान वाढीमुळे आज नैसर्गिक आपत्तीच्या प्रमाणात वाढ झालेली असून, 3 मे 2019 रोजी ओडिशाला वादळाच्या बसलेल्या तडाख्याला हवामान बदलाबरोबर तापमान वाढही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या तीस वर्षात ताशी 175 किलोमीटर गतीने प्रवाहित होणारे असे वादळ ओडिशात आले नव्हते. अकरा लाख लोकांचे सुरक्षित ठिकाणी यशस्वीरित्या स्थलांतर केल्याने वादळामुळे मनुष्यहानी उद्भवली नाही. परंतु मालमत्तेची मात्र प्रचंड हानी झाली.

अकाली होणारी प्रचंड पर्जन्यवृष्टी, विलक्षण गतीने येणारी वादळे, कडाक्याची थंडी, वाळवंटात झालेली बर्फवृष्टीसारखी संकटे ही हवामान बदलामुळे तीव्र होत चाललेली आहेत असे मानले जाते. गोव्यासारख्या अरबी सागराच्या किनारपट्टीवर वसलेल्या राज्यातल्या हवेत दमटपणा असल्याने, तप्त उन्हांच्या झळा स्थानिकांना असहय़कारक करत आलेल्या आहेत. हवा, पाणी, ध्वनी यांचे वाढते प्रदूषण, जीवाश्म इंथनाच्या वारेमाप वापराने कर्ब वायूच्या होणाऱया उत्सर्जनात परिसरातल्या हवामानात आल्हाददायकता गायब होऊ लागलेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातल्या काही भागातले जलस्रोत पूर्णपणे आटल्याने तेथील लोकांना घोटभर पिण्याच्या पाण्याच्या प्राप्तीसाठी जीवघेणा संघर्ष करण्याची पाळी आलेली आहे. ग्रीनलँड येथील सुमारे 80 टक्के भूपृष्ठावरची जागा महाकाय बर्फाच्या आच्छादनाने आणि पिण्यायोग्य पाण्याने व्यापलेली आहे. परंतु 1972 पासून येथील बर्फाच्या विलक्षण गतीने वितळण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून, नवीन संशोधनानुसार या प्रमाणात होणारी अभिवृद्धी शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. गेल्या आठ वर्षांच्या कालखंडात, बर्फ वितळण्याच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे जागतिक समुद्राच्या पातळीत सहा मिलीमीटर वृद्धी झालेली आहे. दरवर्षी ग्रीनलँडमध्ये सुमारे एकावन्न ट्रीलीयन किलोग्रॅम बर्फ वितळण्याचे प्रमाण आहे. ग्रीनलँडमध्ये बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेत झालेल्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत झपाटय़ाने गायब होणार असल्याने, आगामी काळात हे संकट आणखी बिकट होणार असल्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागलेली आहेत.

पश्चिमी ऑस्ट्रेलियातल्या सागरी पाण्याच्या तापमानात उष्णतेच्या लाटेपायी झालेल्या वृद्धीने डॉल्फिनच्या प्रजननाच्या प्रमाणावर अनिष्ट परिणाम उद्भवलेले असून, जन्माला येणाऱया डॉल्फिनच्या जीवनमानावरती संकटे आलेली आहेत. अभ्यासातून सागरी प्रजातीच्या अन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणाऱया सागरी गवतावरती उष्ण हवामानाचे परिणाम जाणवू लागल्याचे स्पष्ट झालेले आहे. सागरी गवतांवरती अवलंबून असलेले समुद्रातले प्राणी त्यामुळे संकटग्रस्त झालेले आहेत. कॅनडासारखा देश आज तापमानवाढीच्या संकटाच्या छायेत असल्याचा अहवाल हल्लीच तेथील सरकारने प्रकाशित केलेला असून, त्यात तीव्र उष्णतेची लाट, वादळासह पर्जन्यवृष्टीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. वैश्विक तापमानात 0.9 डिग्रीने वाढ झालेली असून, कॅनडात ही वाढ 1.7 डिग्री सेल्सिअसने झालेली आहे. हिमनग वितळण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होत आहे. तापमान वाढीच्या संकटाला नियंत्रित करावे यासाठी कॅनडात कर्ब वायूच्या होणाऱया उत्सर्जनावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तेथील सरकारने प्रयत्न आरंभलेले आहेत.

हवामान बदलातल्या तीव्रतेच्या तडाख्याचे दुष्परिणाम जगभर जाणवू लागलेले आहेत. 62 दशलक्ष लोकांना या संकटाचे चटके 2018 साली बसलेले आहेत. उष्ण कटिबंध प्रदेशात सक्रिय असलेल्या इदाइ वादळाने प्रलयंकारी महापुराबरोबर मोझांबिक, झिम्बाब्वे आणि मालावीमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवितहानी केलेली आहे. आज 35 दशलक्षपेक्षा ज्यादा लोक पुरांचे शिकार ठरलेले आहेत तर 9 दशलक्ष दुष्काळाच्या छायेखाली ग्रस्त आहेत. 2017 साली अन्न सुरक्षा संकटात सापडल्याकारणाने 821 दशलक्ष यथायोग्य अन्न मिळणे दुरापास्त झाले. अन्नाची असुरक्षितता आणि हवामान बदलामुळे उद्भवलेल्या संकटांमुळे जगाच्या वेगवेगळय़ा भागात अन्न, पाण्याचा संघर्ष तीव्र होऊन निर्वासितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.

आज पर्यावरणीय परिसंस्थांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने त्यांच्यावरती ज्यांचे अस्तित्व अवलंबून आहे त्या माणसांचे आणि अन्य सजीवमात्रांच्या प्रजातीचे जीवन संकटात सापडलेले आहे. आमची अर्थव्यवस्था, जीवनमान, अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवन जगण्याचा स्तर अवलंबून असलेल्या परिसंस्थांच्या अस्तित्वावरती घाला घालून खरेतर आम्ही आमचा पाया ठिसूळ करत आहोत. भूपृष्ठावरच्या स्थानिक प्रजाती संकटात सापडलेल्या आहेत. पशुपक्ष्यांच्या काही प्रजाती कधीच नामशेष झालेल्या आहेत. समुद्री प्रवाळ आणि सागरातली जीवसृष्टी मानवनिर्मित संकटांच्या खाईत सापडलेली आहे.

जगभरातली जैविक संपदा आज आम्ही निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आपल्या अस्तित्वासाठी तीव्रपणे संघर्ष करत आहे. तापमानवाढ आणि हवामान बदलाचे जे संकट गतिमान होऊ लागलेले आहे, त्याला सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्यात आम्ही अपयशी झालो तर आमचे आणि सजीवमात्रांचे अस्तित्व इतिहासजमा होण्यास विलंब लागणार नाही.

राजेंद्र पां. केरकर