|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्तोत्रसाहित्य आणि श्रीमद्शंकराचार्य

स्तोत्रसाहित्य आणि श्रीमद्शंकराचार्य 

संस्कृत साहित्यात स्तोत्रसाहित्य विपुल आहे. भगवद्भक्त कवींनी अत्यंत प्रेमाने आपले अंतःकरण ह्या स्तोत्रातून मोकळे केले आहे. स्तोत्र म्हणजे स्तुती. विविध देवदेवतांच्या स्तुतीपर ही स्तोत्रे रचली आहेत. भक्तीच्या आवेशात केलेल्या भावांच्या सुंदर आविष्कारामुळे वाचक भौतिक जगाला विसरून आनंदमय जगतात रममाण होतात. अशा ह्या स्तोत्रकवींमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान श्रीमद्शंकराचार्यांचे आहे. ते नुसतेच कवी नव्हे, तर यती, ग्रंथकार, अद्वैत सिद्धांताचे खंदे समर्थक आणि धर्मसाम्राज्याचे थोर संस्थापकही होते. भारतवर्षात होऊन गेलेली ती दिव्य विभूती आहे. ज्या काळात भारतात अनाचार, पाखंड, अधर्म माजला होता, अशा काळात त्यांचा उदय झाला.

त्यांचा जन्म केरळ राज्यातील अलवाई नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गसंपन्न अशा कालटी नावाच्या छोटय़ा गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरु आणि आईचे नाव विशिष्टा होते. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि कोमल अंतःकरणाचे होते.नुसते दार्शनिक नव्हे, तर उच्च कोटीचे प्रतिभासंपन्न कवीही होते. गद्य आणि पद्य सहजरित्या लिहीत. त्यांच्या विशुद्ध आचरणामुळे, ग्रंथकर्तृत्वामुळे आणि अखंड दीर्घोद्योगामुळे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले. त्यांची ग्रंथसंपदा अफाट आहे.

त्यांनी श्रुती, स्मृती, ब्रह्मसूत्रे ह्या प्रसथानत्रयींवरील भाष्ये (प्रस्थान-गमन) म्हणजे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मं व नापरः। अर्थात् 1. ब्रह्म हेच सत्य म्हणजे अंतिम तत्त्व आहे.2. जग हे भ्रमात्मक आहे.3. जीव हा ब्रह्मच आहे. 4. जीव ब्रह्माहून कोणत्याही प्रकारे भिन्न नाही. हे अद्वैतवादाचे चार सिद्धांत त्यांनी प्रस्थापित केले. ह्याचबरोबर त्यांनी रचलेली एकापेक्षा एक सरस स्तोत्रे ही संस्कृत साहित्याला मिळालेली अनमोल देणगी आहे.निर्गुणाच्या प्राप्तीसाठी सगुणाची उपासना हे सर्वात मोठे साधन आहे.म्हणूनच त्यांनी शिव, विष्णू, गणेश, देवी इत्यादींची सुंदर भावपूर्ण स्तोत्रे रचली. श्रीभगवतीदेवीवर्णनपर वीस श्लोकी आनंदलहरी, दक्षिणामूर्तीस्तोत्र, चर्पटपंजरी हे सतरा श्लोकी नादमधुर स्तोत्र, षट्पदी, हरिमीडे हे विष्णूप्रशंसापर स्तोत्र, शिवभुजंगप्रयात हे चौदा श्लोकी स्तोत्र, जे त्यांनी आपल्या मातेच्या अंतकाळी म्हणून शिवाला आळवले, सौंदर्यलहरी हे शतक काव्य असून स्तोत्रसाहित्याचा मुकुटमणी आहे. त्यात पहिल्या 41 श्लोकात तांत्रिक विद्येची रहस्ये उलगडली आहेत, तर पुढील 59 श्लोकांत त्रिपुरसुंदरी ह्या उपास्य देवतेचे वर्णन आहे. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीवर आपल्या आचरणाने, प्रखर बुद्धिमत्तेने आणि वैदिक धर्माच्या पुरस्काराने आद्य शंकराचार्यांनी अमीट ठसा उमटवला आहे.