|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चंद्रयान-2

चंद्रयान-2 

चंद्रयान-2 हे स्वदेशी यान 15 जुलैच्या पहाटे अवकाशात झेपावणार आहे. त्यासाठी  भारतीय अवकाश संशोधन संस्था सरसावली आहे. इस्रोमुळे भारताचा जगभर बोलबाला आहे. आता या क्षेत्रात इस्रोचे नव्याने दमदार पाऊल पडते आहे. ओघानेच हिंदुस्थानचा तिरंगा उंचावला जाणार आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. या चंद्राचे सर्वांनाच आकर्षण आहे. कवीचा आणि प्रेमीजनांचा जसा तो आवडता तसा लहान मुलांचा तो चांदोमामा आणि सासूरवाशीण महिलेचा भाऊ चंद्र या संबंधाने अनेक गोष्टी आणि चालीरिती आहेत. आजही चंद्रोदय झाल्याशिवाय लोक संकष्टी सोडत नाहीत आणि चंद्र दर्शन झाल्याशिवाय रमजानचा सण साजरा होत नाही. तथापि, अवघ्या मानवजातीला पृथ्वीसोबत आणखी कोठे मनुष्यवस्ती आहे का  किंवा मनुष्यवस्ती करता येईल का हे प्रश्न दीर्घकाळ सतावत आहेत. ब्रम्हांडात अनेक सूर्यमाला आणि अनेक ग्रह आहेत. या शतसूर्याचा शोध आणि मानवजातीला राहण्यायोग्य नवा गृह शोधण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी संशोधन होते आहे. जग प्रगत होते आहे. एकेकाळी ग्रहण लागले की गुहेत लपणारा आदीमानव आज अंतरिक्षातील अनेक गोष्टींचा वेध घेतो आहे आणि आनंदाची बाब म्हणजे त्यामध्ये भारत आघाडीवर आहे. उपग्रह सोडणे असो अथवा मंगळयान सोडणे असो अथवा चंद्र मोहीम असो भारत प्रगतीच्या दिशेने पावले टाकत आहे. 21 जुलै 1969 रोजी चंद्रावर माणसाने पाय ठेवला तेव्हा सर्वांना झालेला आनंद अवर्णनीय होता. अमेरिकेने हे यान पाठवले होते आणि नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले होते. या आनंदात भारताने भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना केली. आता घटनेला आणि चंद्रावर माणसाने पाऊल ठेवले या घटनेला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. या 50 वर्षात या क्षेत्रात अनेक चांगल्या घटना घडल्या, प्रगतीच्या दिशेने पावले पडली आणि देशाचे नाव झाले. आता चांद्रयान-2 या मोहिमेमुळे त्यावर चारचाँद लागणार आहेत. चांद्रयान-एक मोहीम झाली तेव्हा यान भारतीय बनावटीचे होते आणि पेलोड विदेशी होते पण, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्रयान-2 मोहिमेअंतर्गत जे यान आणि पेलोड झेप घेणार आहे ती पूर्ण भारतीय बनावटीची, अत्याधुनिक आणि अनेक गोष्टींचा वेध घेत मानवी प्रगतीला, उन्नतीला हातभार लावणारी आहेत. यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचे, तंत्रज्ञानाचे आणि इस्रोचे आगाऊ अभिनंदन केले पाहिजे. शनिवारचा सूर्य भारतीयासाठीच नव्हे अवघ्या मानव जातीसाठी खुशखबर घेऊन येणार आहे. हे यान चंद्रावर उतरेल तेव्हा अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. आजवर चंद्रासंदर्भात ज्या मोहिमा झाल्या त्यामध्ये दक्षिण धुवावर कोणतेही यान उतरवण्यात आले नव्हते पण, शुक्रवारी झेपावणारे आपले यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. श्रीहरिकोटा येथून पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी यान सोडले जाईल व ते 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्रावर पोहचेल अशी अटकळ आहे. या यानाचे तीन भाग आहेत. यापैकी एक भाग उपकरण सज्ज आहे. तो चंद्राभोवती फिरत राहिल आणि तेथील माहिती, छायाचित्रे नोंदी घेत राहिल. इस्रोकडे पाठवत राहिल. एक भाग दक्षिण धुवावर उतरेल, तिथे शोध घेईल. मूलद्रव्यांची व खनिजांची माहिती घेईल आणि तिसरा भाग म्हणजे गाडी अर्थात रोअर आहे ती चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. भारताच्या या मोहिमेमुळे आणि तिहेरी प्रयत्नाने चंद्राचा नव्याने परिचय झाला तर आश्चर्य वाटायला नको. चंद्रावरती हवा, मूलद्रव्ये, खनिजे, पृथ्वीपासून चंद्राचे नेमके अंतर, चंद्रावरुन अंतरिक्षाचा वेध, पृथ्वीचा वेध अशा अनेक गोष्टीवर चंद्रयान दोन मोहिमेमुळे प्रकाश तर पडेलच पण चंद्रयान एकपेक्षा चंद्रयान दोनमध्ये जी आधुनिकता आणि व्यापकता आहे ती पाहता या मोहिमेतून अनेक रहस्ये उलगडतील असा देशवासियांना आणि इस्रोला विश्वास वाटतो आहे. हे देशाचे यश आहे. ओघानेच ते साजरे झाले पाहिजे आणि त्यामध्ये राजकारण येता कामा नये. अलीकडे प्रत्येक गोष्टीचा संबंध राजकारणाशी आणि पक्षीय हेव्यादाव्यासाठी लावला जातो आहे, हे बरे नाही. सर्जिकल स्ट्राईक असो, एअर अटॅक असो अथवा इस्रोकडून उपग्रह सोडण्याचा विक्रम असो या साऱया गोष्टी देशाची मान ताठ करणाऱया आहेत. हे यश कोण्या पक्षाचे वा नेत्याचे नाही, ते देशाचे, वैज्ञानिकांचे, संशोधकांचे यश आहे. या शास्त्रज्ञांना मदत करणे, निधी पुरवणे, प्रोत्साहन देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे काम किंवा संशोधन कुण्या पक्षासाठी नाही तर अवघ्या मानवजातीसाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि या अभियानाला जात, धर्म, पक्ष, भाषा असा कोणताही संकुचित विचार जोडला जाणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. ओघानेच मोहिमेसंदर्भात आणि तिला झालेल्या उशिरासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप नकोत. चंद्रावर माणसाने पाय ठेवला या घटनेला 50 वर्षे होत आहेत. तसा बराच काळ लोटला आहे. तथापि, या काळात तेथे पुन्हा मानव का गेला नाही हे कोडे आहे. चंद्राचे व्यापक संशोधन माणसांना अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माणसाला राहण्यायोग्य आणखी एक ग्रह हे स्वप्न आता फार दूर नाही असे या व अशा प्रयत्नांमुळे वाटते. आपण मंगळ मोहीम केली त्याचा खर्च ऑटोरिक्षा सारखा प्रत्येक कि.मी.ला 2 ते 3 रु. होता. चांद्रयान दोन मोहिनेसाठी 603 कोटी खर्च येणार आहे. पण, तसा तो जास्त नाही. मध्यरात्रीनंतर पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी हे यान झेपावणार आहे. हा प्रसंग आपण दूरचित्रवाणीवर, इंटरनेटवर बघितला पाहिजे. मुला-मुलींना नातवंडांना दाखवला पाहिजे. देशभक्ती म्हणूनही आणि उद्याच्या शास्त्रज्ञांचे कुतूहल जागे करण्यासाठी हे दर्शन महत्त्वाचे आहे. आवर्जून हे काम केले पाहिजे. पंधरा ऑगस्ट रोजी इस्रो आपला सुवर्ण महोत्सव साजरा करेल. त्यावेळी इस्रोच्या दिमाखदार वाटचालीत ज्या सुवर्ण पाऊलखुणा म्हणून नोंद होतील त्यामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीचे चंद्रयान दोन हे पाऊल ठसठशीत ठसा उमटवेल हे वेगळे सांगायला नको. इस्रोच्या या यशात अनेकांचे मोठे योगदान आहे. अनेकांनी आपले अवघे आयुष्य या संशोधनाला जोडले होते आणि आजही अनेक जण त्यासाठी मेहनत घेत आहेत. या मोहिमेसाठी, तिच्या यशस्वीतेसाठी आणि मानव कल्याणाचा ध्यास घेऊन प्रगतीची उंच उंच शिखरे गौरी शिखरे सर करणाऱया सर्वांसाठी शुभेच्छा!