|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली

जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली 

प्रतिनिधी/ तासगाव

तासगाव-विसापूर रस्त्यावर विसापूरनजीक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची 25 लाख रुपयांची रक्कम चौघा अज्ञात चोरटय़ांनी लुटली. बँकेतील क्लार्क व शिपाई यांचा पाठलाग करुन मोटारसायकल आडवून डोळ्यात चटणी टाकून मारहाण करुन चोरटय़ांनी आपले काम फत्ते केले. ही घटना शुक्रवारी दुपारी 12 च्या दरम्यान घडली. तर क्लार्क व शिपाई यांनी चोरटय़ांना रोखण्याचा केलेला प्रयत्न केला. मात्र गोळी घालण्याची धमकी दिल्याने हा प्रयत्न असफल ठरला. याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीवरुन चौघा अज्ञात चोरटय़ांच्या विरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडताच तासगावसह अन्य ठिकाणी नाका बंदी करण्यात आली होती.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शहाजान मुबारक मुलाणी हे क्लार्क म्हणून नोकरीस आहेत. तर सुनील लालासाहेब मोहिते हे शिपाई म्हणून नोकरीस आहेत.  बँकेच्या व्यवहारासाठी शाखाधिकाऱयांच्या सूचनेवरुन चार पाच दिवसातून रक्कम आणण्यासाठी तासगावातील कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील जिल्हामध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत हे येत असतात.

शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान क्लार्क मुलाणी व शिपाई मोहिते हे हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम.एच. 10 बीबी. 9279 वरुन विसापूर येथून निघाले. 11 च्या दरम्यान तासगावातील मार्केट यार्ड शाखेत ते आले. तेथून 25 लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेऊन ती प्लास्टिकच्या ठिक्यामध्ये ठेवली. हे दोघे विसापूरकडे जाण्यास निघाले. यावेळी मुलाणी हे मोटारसायकल चालवत होते. तर मोहिते हे रकमेचे ठिक्के घेऊन पाठीमागे बसले होते.

खानापूर फाटय़ापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जिरवळ मळा नजीक सावंता माळी यांच्या शेतासमोर मुलाणी व मोहिते यांची मोटारसायकल आली असता त्यांच्या पाठीमागून अचानक तोंडाला रुमाल बांधलेले दोघेजण मोटारसायकलवरुन आले. या दोघांनी मुलाणी, मोहिते यांच्या डोळ्यात चटणी मारली तसेच मोटारसायकलला लाथ मारली. यावेळी मुलाणी मोटारसयकल सावरुन पुढे जात असतानाच समोरुन एका मोटारसायकलवरुन दोघेजण तोंडाला रुमाल बांधून आले. व त्यांनी आपली मोटारसायकल मुलाणी यांच्या मोटारसायकलच्या आडवी आली. त्यांनीही मुलाणी व मोहिते यांच्या डोळ्यात चटणी मारली. त्यामुळे त्यांना आपली मोटारसायकल पुढे घेऊन जाता आला नाही. याचवेळी मोहिते यास त्यांनी हाताने मारहाण करुन मोटारसायकलवरुन खाली पाडले. यानंतर मुलाणी व मोहिते आपल्याजवळील 25 लाख रुपयांचे ठिक्के जाम धरून ठेवले.

याच दरम्यान चोरटय़ांनी मुलाणी व मोहिते यांच्या हातातून पैशाचे ठिक्के जबरदस्तीने ओढून घेतले व ते त्यांच्या मोटरसायकलवरुन जाऊ लागले. त्यावेळी मुलाणी व मोहिते यांनी सीबीझेड मोटरसायकलचे पुढील हेडलाईट व्हायझर हाताने जाम धरले होते. दोघांनी हे व्हायझर जोरात ओढल्याने ते त्यांच्या हातात आले. तर चोरटे व बँकेचे कर्मचारी यांच्यात झटापटी झाली. यावेळी चोरटय़ापैकी एकाने गोळी घाल असे म्हणताच मुलाणी व मोहिते घाबरुन बाजूला झाले.

ही रोकड कब्जात मिळताच दोन्ही मोटरसायकलवरील चौघे चोरटे तासगाव रोडने निघून गेले. याचवेळी या आवाजाने शेजारील वस्तीवरील लोक तेथे आले. त्यापैकी एकाच्या मोटरसायकलवरुन मुलाणी यांनी पाठलाग केला. त्यावेळी ते ढवळी रोडने गेले. चोरीचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी, अशोक बनकर, पो.नि. राजेंद्र सावंत्रे, उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांनी व विसापूरचे पोलीस पाटील संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर घटनास्थळी चोरटय़ांनी आणलेल्या चटणीचा अर्धवट पुडा, बँक कर्मचाऱयांचे चप्पल, चेष्मा, केस पडलेले दिसून येत होते.

घटनास्थळीच कसून चौकशी

घटनेचे वृत्त समजताच उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांनी पोलीस कर्मचाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली. काहीवेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर व नंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अशोक बनकर यांनी क्लार्क मुलाणी व शिपाई मोहिते यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत कसून चौकशी केली. व घटनास्थळावरुन तासगाव सह अन्य ठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. आणि लगेचच तपासाची यंत्रणा कामाला लागली. तर अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनीही तासगाव येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी बँकेचे क्लार्क शहाजान मुबारक मुलाणी यांनी अज्ञात चौघा चोरटय़ाविरुद्ध फिर्याद दिली असून अधिक तपास पो.नि. राजेंद्र सावंत्रे करीत आहेत.

आमदार सुमनताई पाटील यांची बँकेला भेट

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विसापूर शाखेच्या कॅशची चोरी झाल्याचे समजताच आ. सुमनताई पाटील यांनी बँकेच्या तासगाव शाखेत भेट देऊन शाखाप्रमुख पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. व या चोरीचा तपास तातडीने करुन हा गुन्हा उघडकीस आणवा अशी मागणी केली.

तर आज ही वेळ आली नसती : संचालक डॉ. प्रताप पाटील

तासगावातील मार्केटयार्ड येथे जि.म. बँकेची मुख्य शाखा आहे. तर तासगावसह तालुक्यात बँकेच्या सुमारे 17 शाखा आहेत. तालुक्यातील या सर्व बँकांना पैसे पोहोच करण्यासाठी बँकेच्या स्वतंत्र वाहनाची सोय असावी अशी मागणी बँकेचे संचालक डॉ. प्रताप पाटील यांनी सहा महिन्यापुर्वी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत केली होती. त्याची अंमलबजावणी झाली असती तर आज ही वेळ आली नसती असे मत डॉ. प्रताप पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.

Related posts: