|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचऱयाचे वर्गीकरण हे अत्यंत आवश्यक

कचऱयाचे वर्गीकरण हे अत्यंत आवश्यक 

प्रतिनिधी/ मडगाव

पालिका संचालक तारीक थॉमस यांनी शुक्रवारी सोनसडय़ाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टीन्स, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई, सेनिटरी निरीक्षक विराज आरबेकर, कचरा विभाग हाताळणारे कनिष्ठ अभियंता मिस्किता हे हजर होते. थॉमस यांनी यावेळी कचऱयाचे वर्गीकरण हे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

सोनसडय़ावर आल्यानंतर कचऱयाचे वर्गीकरण होता कामा नये, तर यार्डात वर्गीकरण करूनच कचरा यायला हवा, असे थॉमस यांनी याप्रसंगी सांगितले. त्यानंतर बाजारपेठांनाही त्यांनी भेट दिली. याअंतर्गत किरकोळ व घाऊक मासळी बाजार, एसजीपीडीए भाजी बाजार यांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तेथील तसेच गांधी मार्केटमधील मिळून दिवसाकाठी 10 टनाच्या आसपास कचरा तयार होत असतो. त्यावर बाजाराच्या ठिकाणीच प्रक्रिया व्हायला हवी. त्यादृष्टीने बायो डायजेस्टर उभारण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सदर बाजारांच्या ठिकाणी बायो डायजेस्टर उभारण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फेकण्यात येणाऱया कचऱयाचे प्रमाणही मोठे

फोमेन्तोचे जे अधिकारी सोनसडय़ावरील पालिका संचालकांच्या भेटीवेळी उपस्थित होते त्यांनी वर्गीकरण करून न आल्यास कचऱयावर प्रक्रिया होऊ शकणार नसल्याचे नजरेस आणून दिले. लोकांकडून सडेकर लेनसारख्या शहरातील ठिकाणी तसेच मडगाव पालिका हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी कुडतरी, नुवे, माजोर्डा, नावेली यासारख्या पंचायत क्षेत्रांतील लोकांकडून कचरा फेकण्याच्या घटना घडत असतात. तशा कचऱयाच्या मोठय़ा पिशव्या नेहमी सापडत असतात. हा कचरा 10 ते 15 टनांमध्ये जातो आणि तो संमिश्र असतो, याकडेही याप्रसंगी लक्ष वेधण्यात आले.

वर्गीकरण करावेच लागेल

यावेळी फोमेन्तोने कचरा प्रकल्पासंदर्भात जी अंतिम नोटीस बजावली आहे त्यासंबंधी विचारले असता त्यांनी यासंदर्भात करार झालेला असून हा विषय मडगाव पालिका व कंपनीमधील असल्याकडे लक्ष वेधले. कचरा वर्गीकरणाशी त्याचा संबंध नाही. हीच कंपनी राहिली वा अन्य कुणीही पुढे आले, तरी वर्गीकरण हे करावेच लागेल, असे ते म्हणाले.

वर्गीकरण केलेला कचराच उचला

शुक्रवारी मडगाव पालिकेत कचरा विभाग हाताळणारे कनिष्ठ अभियंता मिस्किता यांनी घरोघरी कचरा गोळा मोहिमेत गुंतलेले रोजंदारीवरील कामगार, चालक, पर्यवेक्षक यांची पालिकेत बैठक घेऊन त्यांना वर्गीकरण झालेला कचराच उचलावा आणि कचरा संमिश्र स्वरूपात दिल्यास तो उचलू नये, असे सांगितले. कचरा वर्गीकरण करून देण्यास लोकांना चांगल्या प्रकारे सांगावे. यासंदर्भात जागृती करणारी माहिती पत्रके वितरित केली जातील, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी व शुक्रवारी सुका कचरा उचलला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोनसडो प्रश्नावर तोडगा काढा : सार्दिन

याशिवाय खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन सोनसडय़ाच्या समस्येसंदर्भात चर्चा केली. सोनसडय़ामुळे सभोवतालच्या परिसरांतील लोकांना भरपूर त्रास होऊ लागल्याने त्यावर एकदाचा कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना सांगितले. यावेळी पालिका संचालकही हजर होते.

Related posts: