|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-जपान अंतिम फेरीत

भारत-जपान अंतिम फेरीत 

महिला हॉकी सिरीज फायनल्स : दोन्ही संघ ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी पात्र

वृत्तसंस्था/ हिरोशिमा

ड्रगफ्लिकर गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी सिरीज फायनल्स स्पर्धेत चिलीचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करून टोकियो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्थान मिळविले आहे. भारताबरोबर जपाननेही अंतिम फेरी गाठून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्थान मिळविले आहे. या दोन संघांत रविवारी अंतिम लढत होणार आहे.

येथील स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱया संघांना ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्थान दिले जाते. या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात ही पात्रता स्पर्धा होणार आहे. गुरजितने 22 व 37 व्या मिनिटाला दोन गोल केले तर नवनीत कौरने 31 व्या आणि कर्णधार रानी रामपालने 57 व्या मिनिटाला भारताचे गोल नोंदवले. कॅरोलिना गार्सिया (18) व मॅन्युएला उरोझ (43) यांनी चिलीचे गोल केले.

दुसऱया उपांत्य सामन्यात यजमान जपानने रशियाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानने रशियावर मात केली.

महिला हॉकी मानांकनात नवव्या स्थानावर असलेल्या भारताने स्पर्धेत पहिल्या सामन्यात उरुग्वेचा 4-1, दुसऱया सामन्यात पोलंडचा 5-0 तर तिसऱया सामन्यात फिजीचा 11-0 अशा गोलफरकाने पराभव केला आहे तर 16 व्या स्थानावर असणाऱया चिलीचा 4-2 अशा फरकाने पराभव केला आहे. चिलीने मेक्सिकोला 7-0, यजमान जपानला 3-1, तिसऱया सामन्यात रशियाने चिलीला 5-2 असे पराभूत केले. लालरेमसियामीच्या

वडिलांना विजय समर्पित

सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू खुप खुश झाल्या होत्या. मात्र या विजयाला दुखाची किनारही लाभली होती. या संघातील एक खेळाडू लालरेमसियाच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. मात्र ती मायदेशी न जाता खेळण्याचा निर्णय घेतला. अशा दुखी मनःस्थितीतही ती खेळत राहिली. सामन्यानंतर कर्णधार रानी रामपालने याचा उल्लेख केला आणि हा विजय तिच्या दिवंगत वडिलांना समर्पित केला. ‘आपली एक संघसहकारी लालरेमसियामी हिच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले असून हा विजय त्यांना मी समर्पित करीत आहे. त्यांचा आत्म्याला शांती लाभेल, अशी मी आशा करते. दुखी मनोवस्थेतही तिने खेळण्याचा निर्णय घेतला आणि तिने चांगले प्रदर्शनही केले, आम्हाला तिचा अभिमान वाटतो. अंतिम फेरी गाठल्याचा खूप आनंद होतो,’ अशा भावना रानीने व्यक्त केल्या