|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला

रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पाऊस सक्रीय झाला असून पावसाची संततधार कायम आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात तसेच आंबोली परीसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत असून आजरा शहरापासून जवळच असलेल्या रामतीर्थ येथील रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे.

यावर्षी मोसमी पाऊस तालुक्यात उशिराने दाखल झाला. यामुळे रामतीर्थ धबधबाही जून अखेरीस प्रवाहीत झाला आहे. धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागल्यानंतर शनिवार दि. 29 रोजी पहिल्याच दिवशी पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी रामतीर्थ येथे गर्दी केली होती. धबधबा पावसाळय़ात पर्यटकांना खुणावतो, फेब्रुवारीनंतर जून मध्ये पाऊस सुरू होईपर्यंत कोरडा असणाऱया या धबधब्याला पाण्याची प्रतिक्षा असते. आंबोली परीसर व तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या पावसाने नदीला पाणी आल्यानंतर 24 जून पासून धबधबा प्रवाहीत झाला होता. पण कमी पाण्यामुळे धबधब्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता आले नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवार दि. 28 रोजी रात्रीपासून रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. .

वर्षा पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांचे खास आकर्षण असणारा हा धबधबा फेबुवारीनंतर पुन्हा पाऊस सुरू होऊन नदीला पाणी येईपर्यंत कोरडा राहतो. यामुळे या काळात या परीसरात येणाऱया पर्यटकांची संख्याही कमी असते. पाऊस सुरू होऊन धबधबा सुरू झाल्यानंतर आपोआपच पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळतात. शनिवारी सकाळपासून धबधबा कोसळू लागल्याचे समजताच स्थानिक तसेच आंबोलीकडे ये-जा करणाऱया पर्यटकांनी रामतीर्थ येथे गर्दी केली होती.

तालुक्याच्या सर्वच भागात जोरदार पावसाला प्रारंभ झाला असून शेतीच्या खोळंबलेल्या कामालाही आता गती येणार आहे. भात रोप लावणीचे तरवेही लावणी योग्य झाले आहेत. नाचणी लागवडीसाठी टाकण्यात आलेले तरवेही चांगल्या पद्धतीने उगवण झाले आहेत. यामुळे पुढील आठ दिवसात नाचणी तसेच भात रोप लावणीच्या कामालाही वेग येणार आहे. भात, भुईमुग, सोयाबीन पेरणीनंतर पावसाची चातका प्रमाणे वाट पाहणाऱया  शेतकऱयाला सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दि. 29 जून रोजी तालुक्यातील आजरा येथे 51 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गवसे येथे 24 मी. मी., मलिग्रे येथे 28 मी. मी. व उत्तूर येथे 20 मी. मी. पाऊस नोंदला गेला आहे. 1 जून पासून तालुक्याच्या चार मंडल विभागात पावसाच्या झालेल्या नोंदीनुसार तालुक्यात 600 मी. मी. पाऊस झाल्याचे दिसत असले तरी सरासरी 150 मी. मी. पाऊस नोंदला गेला आहे.

Related posts: