|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वे ओव्हरब्रिजच्या दुरूस्तीसाठी अधिकाऱयांचा आटापिटा

रेल्वे ओव्हरब्रिजच्या दुरूस्तीसाठी अधिकाऱयांचा आटापिटा 

बेळगाव / प्रतिनिधी

बसवेश्वर उड्डाणपुलाचा फुटपाथ आणि रस्ता खचल्याने रेल्वे खात्याचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. अधिकाऱयांनी रविवारी रात्री पाहणी केली. तसेच लागलीच सोमवारी सकाळी फुटपाथवरील पेव्हर्स हटवून दुरूस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे.

उड्डाणपुलाचा रस्ता खचण्यास प्रारंभ झाल्याची माहिती मिळताच रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांची झोप उडाली आहे. यापूर्वी ठिकठिकाणी रस्ता खचल्याने चौकशीची मागणी करण्यात आली होती. याचा धसका घेऊन रविवारी रात्रीच त्यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. तसेच सोमवारी सकाळपासूनच येथील पेव्हर्स हटवून रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. रेल्वे खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंते व विभागीय अभियंते याठिकाणी ठाण मांडून आहेत. ओव्हरब्रिज मोठय़ा प्रमाणात खचल्यास नजीकच असलेल्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

पेव्हर्स हटवून रोडरोलरने सपाटीकरण करण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या मध्यभागापासून मराठा मंदिरकडील संपूर्ण फुटपाथच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी काँक्रिट घालण्यात येत असून रस्ता व्यवस्थित करण्याचा आटापिटा अधिकाऱयांनी चालविला आहे. तसेच घरांच्या बाजूनी दगड बसवून माती घसरू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. रेल्वेखात्याने हाती घेतलेले हे काम टिकेल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. उद्घाटन झाल्यानंतर केवळ सहा महिन्यातच उड्डाणपुलाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. पहिल्याच पावसात ओव्हरब्रिज खचण्यास प्रारंभ झाला आहे. आगामी काळात होणाऱया पावसामध्ये ओव्हरब्रिजचा रस्ता शाबूत राहिल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 धारवाड रोड उड्डाणपूल देखील काही ठिकाणी खचल्याचे निदर्शनास आले होते. आता बसवेश्वर उड्डाणपूलदेखील सहा महिन्यातच खचल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोगटे चौकापासून खानापूरकडे जाणाऱया रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. पण हा उड्डाणपुल वारंवार खचत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे तिसऱया रेल्वेगेटवर उभारण्यात येणाऱया उड्डाणपुलाचे काम तरी व्यवस्थित होणार का असा मुद्दाही उपस्थित करण्यात येत आहे. दुरूस्तीचे काम करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

 

Related posts: