|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चार बंधारे पाण्याखाली, सतर्कतेचा इशारा

चार बंधारे पाण्याखाली, सतर्कतेचा इशारा 

वार्ताहर/ एकसंबा/कारदगा/कुन्नूर

परिसरात गेल्या आठवडाभरात झालेली संततधार व कोकणपट्टय़ात झालेला मुसळधार पाऊस याचा परिणाम म्हणून सीमाभागातील सर्वच नद्या प्रवाहित झाल्या आहेत. कोकणातील पाण्याची मोठी आवक दूधगंगा, वेदगंगा नदीपात्रात झाल्याने या नद्यांचे पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर गेल्या आहेत. तसेच पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाल्याने दूधगंगा नदीवरील कारदगा, बारवाड व मलिकवाड येथील बंधारे तर वेदगंगा नदीवरील भोजवाडी बंधारा सोमवारी पहाटे पाण्याखाली गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

आर्द्रा नक्षत्रातील संततधार पावसामुळे प्रथमच कारदगा, बारवाड व भोजवाडी येथील खडकोळ धरणांवर पाणी आले आहे. त्यामुळे कारदगा-भोज, बारवाड-कुन्नूर, मलिकवाड-दत्तवाड व भोजवाडी-शिवापूरवाडी क्रॉस या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. या पुलांवर पाणी आल्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना दोन कि. मी. च्या अंतरासाठी दहा ते बारा कि. मी. चा फेरा मारावा लागत आहे. तसेच कुन्नूर ते भोज, बेडकिहाळ, सदलगा या मार्गावरील वाहतूक निपाणीमार्गे सुरू असून त्यामुळे 25 कि. मी. अधिकचा फेरा होत आहे.

कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर, वेदगंगा नदीवरील सिदनाळ-अकोळ, जत्राट-भिवशी, दूधगंगा नदीवरील सदलगा-बोरगाव व एकसंबा-दानवाड या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तसेच मांगूर येथील पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याचे समजताच प्रांताधिकारी रवींद्र करलिंगन्नावर, चिकोडीचे तहसीलदार डॉ. संतोषकुमार बिरादार यांनी सोमवारी दुपारी कल्लोळ येथील कृष्णा नदीकाठास भेट देऊन पाहणी केली. तसेच निपाणीचे तहसीलदार महादेव बनसी यांनी कारदगा बंधाऱयास भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱयांना पूरस्थिती हाताळण्यास सज्ज राहण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक संगमेश दिडगीनहाळ यांनीही भेट दिली. नदीकाठावर संरक्षणासाठी पोलीस नेमण्यात आले आहेत.

पाण्याची पातळी

महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा प्रवाह सीमाभागात नदीपात्रात येत असल्याने तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सोमवारी दूधगंगा नदीची पाणी पातळी 532.810 मीटर होती. तर कृष्णेची पातळी 578.15 मीटर इतकी होती. राजापूर बंधाऱयातून 23059 क्युसेक पाणी कृष्णा नदीत येत आहे. तर हिप्परगी धरणात 19200 क्युसेक पाण्याची आवक होत असून 19200 पाण्याचा विसर्गही होत आहे.

पावसाचे प्रमाण

चिकोडी तालुक्यातील पावसाचे केंद्र असणाऱया ठिकाणी झालेला पाऊस पाहता चिकोडी 3.4 मी. मी., अंकली 4.6 मी. मी., नागरमुन्नोळी 8.6 मी. मी, सदलगा 23.5 मी. मी., गळतगा 10.2 मी. मी., जोडट्टी 2.8 मी. मी., निपाणी पीडब्ल्यूडी 8.6 मी. मी., निपाणी एआरएस 13 मी. मी., सौंदलगा 8.8 मी. मी. पाऊस झाला आहे.

  सदलगा दूधगंगेत 7 फुटानी वाढ

  सदलगा :- राधानगरी, काळम्मावाडी धरणक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पावसाचा जोर वाढल्याने दोन दिवसापासून दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती.  सोमवारी सकाळी सदलगा येथील दूधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. येत्या काही दिवसात असाच पाऊस तळकोकणात राहिल्यास पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन शेतकरी नदीकाठची मोटारी सुरक्षितस्थळी पोहचवत असल्याचे पहावयास मिळत आहे.

उगार कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

  उगार खुर्द : महाराष्ट्रातील कोकण भागात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी पाण्याविना कोरडी पडलेली कृष्णा नदी आता मात्र दुथडी भरुन वाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून उगार कृष्णा नदीवरील बंधाऱयाची उंची वाढवावी, अशी मागणी होत होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर बंधाऱयाची उंची वाढविल्यास मुबलक पाणीसाठा तैनात होऊन पाणी टंचाइवर मात करता येते. पण सध्या मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

Related posts: