|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नक्षलींकडून शाळकरी मुलांची भरती

नक्षलींकडून शाळकरी मुलांची भरती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

झारखंड आणि छत्तीसगढमध्ये नक्षल प्रभावित भागात शाळकरी मुलांना भरती करून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली आहे. सीपीआयच्या माओवादी गटाकडून हे घृणास्पद कृत्य केले जात असून या मुलांना लष्करी प्रशिक्षण देण्यापर्यंत नक्षलींकडून प्रयत्न चालवले जात असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले. तथापि या मुलांना नक्षलींच्या प्रभावीखाली जाण्यापासून रोखण्यासाठी विविध माध्यमातून वेगवेगळे उपाय सरकार राबत असल्याचेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.

लोकसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये नक्षलींविरोधात जोरदार मोहीम उघडल्याने त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. नक्षलींच्या भडकवण्याला कोणीही जुमानत नसल्याने त्यांनी आता लहान, शाळकरी मुलांना लक्ष्य केले आहे. या मुलांना नक्षलींकडून हळुहळू भूल घातली जात आहे. याकरता त्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंचे आमिष दाखवले जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून छोटीमोठी कामे करवून घेतली जातात. स्वयंपाक करणे, नक्षलींसाठी नित्योपयोगी वस्तूंची ने-आण करायला लावणे अशी कामे सांगितली जात असताना हळूहळू त्यांना सुरक्षा यंत्रणांच्या हालचालींची माहिती कशी मिळवायची याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये तयार झालेल्यांना हळुहळू लष्करी प्रशिक्षणाचीही जोड दिली जात असल्याचे रेड्डी म्हणाले.

तथापि केंद्र सरकारने 2015 साली नक्षलींवर नियंत्रण आणण्याकरता ‘राष्ट्रीय धोरण आणि कृती अभियान’ आखले आहे. बहुउद्देशीय आणि विकासाभिमुख धोरणाची वेगाने अंमलबजावणी, सुरक्षा यंत्रणांकरता अत्याधुनिक शस्त्रs, संपर्क यंत्रणा, स्थानिक नागरिकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, मुलभूत अधिकार निश्चिती केल्यामुळे नक्षलींचे बळ कमी होत असल्याचा दावा मंत्री रेड्डी यांनी केला आहे.

रेड्डी म्हणाले, गृह मंत्रालयाकडून सुरक्षा दलांना विविध सुविधा पुरवून राज्य सरकारला नक्षलींवर नियंत्रण आणण्याकरता मदत दिली जात आहे. सीएपीएफ बटालियन्स, हेलिकॉप्टर्स, युएव्ही, स्पेशल रिझर्व्ह बन्स मंजूर केले आहे. गुप्तचर यंत्रणांशी समन्वय, सीआरपीएफचे अतिरिक्त बल, विशेष पायाभूत संरचनेअंतर्गत राज्य पोलीस दल, विशेष पोलीस दलालाही अतिरिक्त निधी व शस्त्रs दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या प्रभावी निर्णयांमुळे व वेगवान अंमलबजावणीमुळे नक्षल प्रभावित भागातील हिंसाचारी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. नक्षलवादाचा प्रभाव देखील कमी होत आहे. 2009 मध्ये उच्चांकी 2258 घटना घडल्या होत्या. परंतु 2018 मध्ये ही संख्या 833 वर आली आहे. तर 2010 मध्ये 1005 बळींवरून मृतांची संख्या 240 पर्यंत कमी आणण्यात सरकार यश आले आहे. नक्षलींवर प्रभावी नियंत्रण आणण्याकरता आणि शाळकरी मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठीही वेगवेगळय़ा माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचेही केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

Related posts: