|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी विद्यापीठात सोमवारी ग्रंथदिंडी काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रग्रंथसह विविध पुस्तके ठेवून विद्यापीठ परिसरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. दिंडीनंतर  प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व कुलसचिव विलास नांदवडेकर यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही ग्रंथ दिंडी काढली. भगवे झेंडे, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, या मागणीचे फलक हातात घेवून कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे, शालेय स्तरावर मराठी भाषा सक्तीची करावी, मराठी भाषा सर्व व्यवहारात पहिल्या क्रमांकावर ठेवावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कन्नड, बंगाली, तमिळ यासह काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिचे महत्त्व पाहता मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. मराठीतील साहित्य कला लोककला तमाशा भजन-कीर्तन शाहिरी यांची जोपासना होण्यासाठी अभिजात दर्जाविषयीचे विधेयक अमलात आणण्याची गरज आहे. शासकीय जाहिराती यामध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळाले पाहिजे. दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे. तसेच न्यायालयासह प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून झाले पाहिजे. यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी शिवसेनेने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मराठी संवर्धनाच्या समितीच्या वतीने मराठी भाषेचा इतिहास व संदर्भ याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकारला तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेवून मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा.

यावेळी शिवाजीराव जाधव, सुजित चव्हाण, विराज पाटील, मंजीत माने,  दिनेश परमार, दिलीप जाधव, राजू सांगावकर, शशिकांत बिडकर, सुनीता हनिमनाळे, सिध्दी मिठारी, राजेंद्र जाधव, पप्पू नाईक यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: