|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपा येत्या विधानसभा निवडणुकीत 25 जागा प्राप्त करणार- माविन गुदिन्हो

भाजपा येत्या विधानसभा निवडणुकीत 25 जागा प्राप्त करणार- माविन गुदिन्हो 

प्रतिनिधी / वास्को

भाजपाने लोकसभा निवडणुकीत देशात 303 जागा जिंकून नेत्रदीपक यश प्राप्त केले. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ केवळ दहा हजार मतांच्या फरकाने निसटला तरी येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपा 25 मतदारसंघात विजय प्राप्त करील असा विश्वास वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला. व मुरगाव तालुक्यात 50 हजार प्राथमीक सदस्य नोंदणी करण्यात येईल असे स्पष्ट केले.

वास्कोतील रवींद्र भवनच्या वीर सावरकर सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या मुरगांव तालुक्यातील चारही मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकत्यांच्या बैठकीत मंत्री माविन गुदिन्हो बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, आमदार एलिना साल्ढाणा, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, भाजपाचे राज्य कार्यरिणी सरचिटणीस सदानंद तानावडे, दक्षिण गोवा  सदस्यता नोंदणी प्रमुख सर्वांनंद भगत, भाजपाचे संघटन सचिव सतीश धोंड, मुरगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, वास्को भाजपा मंडळ अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर, दाबोळी भाजपा मंडळ अध्यक्ष सदा शेटकर, कुठ्ठाळी भाजपा मंडळ अध्यक्ष ज्योएल फर्नांडिस, वास्को सदस्यता नोंदणी प्रमुख रिमा सोनुर्लेकर, दाबोळी  सदस्यता नोंदणी प्रमुख अनिता थोरात, कुठ्ठाळी  सदस्यता नोंदणी प्रमुख नारायण नाईक, दक्षिण गोवा भाजपा सचिव संतोष केरकर, भाजपा कार्यकर्ते तसेच शक्ती केंद्र अध्यक्ष, प्रचारक व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात भाजपाने एकूण 554 जागांपैकी 303 जागा जिंकून मोठे यश प्राप्त केलेले आहे. मात्र दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसच्या उमेदवारांने फक्त दहा हजार मतानी जिंकली. मुरगांव तालुक्यात आपण थोडे अधिक चांगले कार्य केले असते तर चित्र वेगळे दिसले असते असे ते म्हणाले. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पंचवीस जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील चाळीस मतदारसंघात  चार लाख प्राथमिक सदस्यता नोंदणीचे लक्ष्य पार करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यानी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुरगाव तालुक्यातील 40,500 प्राथमिक सदस्यत्व नोंदणीचे लक्ष्य पार करून 50,000 प्राथमिक सदस्य नोंदणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपाच्या प्राथमिक सदस्यता नोंदणीसाठी मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघापैकी मुरगाव मतदारसंघात 10,500, वास्को मतदारसंघात 11,000, दाबोळी मतदारसंघात  10,000 तर कुठ्ठाळी मतदारसंघात  9,000 प्राथमिक सदस्यता नोंदविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

या बैठकीच्या प्रारंभी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाजपाचे राज्य सदस्यता नोंदणी प्रमुख सदानंद तानावडे व भाजपाचे संघटन सचिव सतीश धोंड यांनी सदस्य नावनोंदणी मोहिमेविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष केरकर यांनी केले.

Related posts: