|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीचे रुप मनोहर…

आंबोलीचे रुप मनोहर… 

पर्यटनस्थळी हजारो पर्यटकांची गर्दी

वार्ताहर / आंबोली:

सुट्टीचा दिवस, मुसळधार पाऊस आणि दाट धुके अशा त्रिवेणी संगमावर हजारो पर्यटकांनी रविवारी पावसाळय़ातील आंबोलीचे मनोहर रुप अनुभवले. राज्याच्या विविध भागातून आलेले हजारो पर्यटक आंबोलीच्या धबधब्यासह अनेक पॉईंटवर रेंगाळल्याचे चित्र दिवसभर होते. पर्यटकांची गदी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनीही आंबोलीला भेट देत बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन केले. पुढील शनिवार-रविवारी सलग सुट्टी असल्याने जादा पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, अशी ग्वाही गेडाम यांनी दिली.

रविवारी सकाळपासूनच आंबोलीत मुसळधार पाऊस होता. त्यामुळे सर्वत्र दाट धुके होते. सकाळपासूनच विविध भागातून हजारो पर्यटक वाहनांनी दाखल होत होते. मुख्य धबधब्यासह महादेवगड, कावळेसाद पॉईंट, नांगरतास, हिरण्यकेशी आदी पर्यटनस्थळी पर्यटक आनंद घेत होते. पोलिसांनी पार्किंगचे नियोजन केल्याने वाहतूक कोंडी टळली. जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक वाहतूक नियोजनासाठी कार्यरत होते. यावेळी सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, उपनिरीक्षक अमित गोते, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, आंबोली दूरक्षेत्राचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी येथील पोलीस दूरक्षेत्रालाही भेट दिली. आंबोलीत सेवा देणाऱया पोलिसांना भेडसावणाऱया समस्या जाणून घेत उपाययोजनांचे आदेश त्यांनी दिले. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेगडय़ा, हिटर गरम पाण्याची सुविधा तसेच संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश गेडाम यांनी दिले.

दरम्यान, आंबोलीत गेले दोन दिवस वीज गायब असून त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. दोन दिवस दाट धुके असल्याने काळोखी दुनियेचा अनुभव पर्यटक, ग्रामस्थांना घ्यावा लागला. शनिवारी वीज खंडित झाली होती. रविवारपर्यंत विजेचा पत्ताच नव्हता.

Related posts: