|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दर्शना चव्हाण खूनप्रकरणातील पाचजण निर्दोष

दर्शना चव्हाण खूनप्रकरणातील पाचजण निर्दोष 

प्रतिनिधी/ चिपळूण

जिह्यात गाजलेला व पोलीस, सीआयडी, सीबीआय या यंत्रणांनी स्वतंत्रपणे तपास करून गुन्हा नोंदवलेला येथील दर्शना चव्हाण खून प्रकरणाचा निकाल तब्बल 19 वर्षांनी शनिवारी लागला. खेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आवटे यांनी या खटल्याचा निकाल देताना या प्रकरणातील पाचजणांना निर्दोष मुक्त केले आहे. येथील ज्येष्ठ ऍड.भरत उर्फ बाबा भोसले यांनी सुनावणीनंतर 5 तास आरोपींच्यावतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद मान्य करून हा निकाल देण्यात आला आहे.

  मृत दर्शना चव्हाण हिचा पती विजय चव्हाण, डॉ. अभय मोहिते, डॉ. माधुरी मोहिते, डॉ. अक्षय मोहिते, डॉ. वैशाली मोहिते अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. येथील दर्शना चव्हाण हिचा मृतदेह वेळणेश्वर समुद्रकिनारी 10 मे 2001 रोजी सापडला होता. प्रथम ती आत्महत्या आहे, असे गृहीत धरून गुहागर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र तिचे वडील दत्ताराम आत्माराम आवटे यांनी ही आत्महत्या नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी तपास करून दर्शनाचा पती विजय चव्हाण, डॉ. अभय मोहिते यांच्यावर 498(अ), 306 अन्वये गुन्हा दाखल केला. दर्शना ही डॉ. मोहिते यांच्याकडे नोकरी करत होती, तर पती विजय हा देखील त्याच ठिकाणी नोकरीला होता. मात्र लग्नग्नापूर्वी एक महिना दर्शनाने नोकरी सोडली होती.

 सीआयडीकडे तपास

दर्शनाचे वडील या तपासावर समाधानी नव्हते. त्यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडीने तपास करून पोलिसांनी केलेला तपास बरोबर असल्याचे नमूद केले. मात्र तरीही तिच्या वडिलांचे समाधान झाले नाही व त्यांनी थेट उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करून सीबीआयकडून तपास करण्याची मागणी केली. त्याला उच्च न्यायालयाने मान्यता  दिली.

  खुनाचा गुन्हा दाखल

सीबीआयचे वरिष्ठ डीवायएसपी के. एच सिंन्हा, अप्पर डीवायएसपी पनवार, वरिष्ठ पीएसआय एन. एस. वजू,, पीएसआय पवार या अधिकाऱयांनी या प्रकरणाचा प्रदीर्घ तपास केला आणि तिचा पती विजय चव्हाण, डॉ. अभय मोहिते यांच्यासह डॉ. माधुरी मोहिते, डॉ. अक्षय मोहिते, डॉ. वैशाली मोहिते या पाचजणांवर कट रचून खून करणे, पुरावे नष्ट करणे असे भादंवि कलम 302, 120/ब व 201 अन्वये गुन्हे दाखल केले.

32 साक्षीदार तपासले

 आरोपींकडून ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. भरत उर्फ बाबा भोसले यांनी वकीलपत्र स्वीकारले आणि हा खटला खेड न्यायायलयात सुरू झाला. या प्रकरणात तब्बल 32 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पोलीस, हेदवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मेडिकल कौन्सिलचे अधिकारी, पोलीस पाटील आदींचा समावेश होता. या सर्वांचा उलट तपास ऍड. भोसले यांनी घेतला. तर ऍड. चिन्मय काणे यांनी त्यांना सहाय्य केले.

हे कलमच चुकीचे

विवाहितेचा छळ करणे 498 (अ) हे कलम लावण्यात आले होते. प्रत्यक्षात विवाहितेचा छळ पती आणि त्याचे रक्ताचे नातेवाईक असा या कलमाचा अर्थ होतो. डॉ. मोहिते हे त्याचे रक्ताचे नातेवाईक नाहीत. त्यामुळे हे कलमच चुकीचे लावण्यात आले आहे. तसेच कलम 302चा गुन्हा दाखल आहे. या कलमांतर्गत जर गुन्हा शाबीत झाला नाही तर 306 खाली शिक्षा देता येणार नाही, असे ऍड. भोसले यांनी प्रथमच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अहवालावरच ठेवले बोट

  दर्शना चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालात गुदमरून मृत्यू झाला, असे नमूद करण्यात आले होते. मात्र सीबीआयच्या तपासात प्रथम मारून नंतर पाण्यात फेकण्याची शक्यता त्याच वैद्यकीय अधिकाऱयांनी जबाबात नमूद केली होती. याच मुद्यावर ऍड. भोसले यांनी बोट ठेवले. त्यांनी अनेक दाखले न्यायालयासमोर ठेवले. डॉ. अज्जा आणि डॉ. जवळगीकर यांनी सीबीआयच्या दबावाखाली आपला जबाब लिहून दिला आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास पुराव्यानिशी आणून दिले.

 घटना घडली कुठे?

कट करून दर्शना चव्हाण हिचा खून करण्यात आला, असा सीबीआयचा दावा आहे. मग खून कुठे झाला, ती जागा कुठे आहे, त्या जागेचा पंचनामा केला का, खून करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे व वस्तू कुठे आहेत, खून झाला त्यावेळी मृताच्या अंगावरील कपडे कुठे आहेत, ते न्यायालयासमोर का आणले नाहीत, असे अनेक मुद्दे ऍड. भोसले यांनी उपस्थित करून ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्याच ठिकाणाहून पुढे तपास सुरू करण्यात आला आहे, असे न्यायालयासमोर मांडले.

 यंत्रणेचा दुरुपयोग

सीबीआयचा तपासाच योग्य दिशेने झाला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून मुख्य आरोपींना बगल देऊन निव्वळ सूडबुद्धीने दर्शनाचा पती विजय चव्हाण व डॉ. मोहिते कुटुंबियांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे. कट करून खून करणे या प्रकरणात एक साखळी निर्माण होते. मात्र या प्रकरणात कोणत्याच द्यावर कोणत्याच ठिकाणी ही साखळी जुळताना दिसत नाही, असा युक्तिवाद ऍड. भोसले यांनी सलग 5 तास केला.

संशयाचा फायदा नव्हेच

या प्रकरणात संशयाचा फायदा नव्हेच तर माझे अशिल हे पूर्ण निर्दोष असल्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक मुक्त करण्यात यावे, अशी मागणी ऍड. भोसले यांनी न्यायमूर्ती आवटे यांच्याकडे केली आणि तब्बल 19 वर्षे चाललेल्या या खून खटल्याचा शेवट झाला. न्यायमूर्ती आवटे यांनी मृताचे पती विजय चव्हाण, डॉ. अभय मोहिते, डॉ. माधुरी मोहिते, डॉ. अक्षय मोहिते, डॉ. वैशाली मोहिते या पाचजणांची निर्दोष मुक्तता केली. सीबीआयने तपास करून आरोप ठेवलेल्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्त होण्याची कोकणातील ही पहिलीच घटना आहे. 

न्यायदेवतेने न्याय दिला: डॉ. मोहिते

 या प्रकरणात गेली 19 वर्षे आम्ही पूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली होतो. प्रचंड बदनामी सहन करावी लागली. मात्र आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. 19 वर्षानंतर न्यायदेवतेने योग्य न्याय दिला, अशी प्रतिक्रिया डॉ. अभय मोहिते यांनी निकालानंतर दिली.

Related posts: