|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शून्य पटसंख्येमुळे सहा शाळा बंद

शून्य पटसंख्येमुळे सहा शाळा बंद 

अन्य दहा शाळांमध्ये दोन-तीनच विद्यार्थी : देवगड तालुक्यातील स्थिती

वार्ताहर / देवगड:

‘एक गाव, एक शाळा’ अशी संकल्पना चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर लोकसंख्येच्या वाढीनुसार गावातील वाडी-वस्तीमध्येही मागणीप्रमाणे शाळा निर्माण करण्यात आल्या. गेल्या वीस वर्षांत लोकसंख्या नियंत्रणामुळे शाळांमध्येच विद्यार्थी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे पटसंख्येअभावी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. देवगड तालुक्यातील 216 शाळांपैकी सहा शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद झाल्या आहेत. तर दहा शाळांमध्ये दोन ते तीन विद्यार्थी असून त्यादेखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

देवगड तालुक्यात जि. प. च्या 216 शाळा आहेत. यामध्ये गेल्यावर्षी विद्यार्थी पटसंख्या पहिली ते पाचवीत 4927, तर सहावी ते आठवीत 1251 होती. यावर्षी पहिली ते पाचवीत 4953, तर सहावी ते आठवीत 1169 पटसंख्या आहे. शाळांची संख्या पाहता ही पटसंख्या म्हणजे आगामी काळात यातील बहुतांश प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

पहिली ते चौथी या वर्गाची शून्य पटसंख्या असणाऱया शाळांमध्ये गिर्ये बांदेवाडी, कोर्ले नं. 2, वेळगिवे हसनाद, कुवळे-वीरवाडी, गढीताम्हणे दादरा, अनपूर ऊर्दू या शाळांचा समावेश आहे. एक ते तीन पटसंख्या असणाऱया शाळांमध्ये शिरगाव धोपटेवाडी, बागतळवडे, मिठमुंबरी बागवाडी, वळिवंडे खराडा, मोंडतर, मोंड चिंचवाडी, साळशी धनगर, आरे देवभाटी, आरे गणपती, मुणगे नं. 2 या शाळांचा समावेश आहे. केवळ एक ते दोन विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ एक शिक्षक कार्यरत आहे. यात शासनाचे, पर्यायाने जनतेचे नुकसान आहे. याची दखल घेत आता गावातील मुख्य शाळांमध्ये या शाळेतील मुले शिक्षकांसह दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. गावातील मुख्य शाळेतील पटसंख्याही खालावत आहे.

पालकांमध्ये शहरी शाळांची ओढ

ग्रामीण भागातील जे गाव बाजारपेठांशी अगदी आठ ते दहा कि. मी. अंतराशी जोडले आहेत, त्या गावातील बहुतांशी मुले तेथील हायस्कूलमध्ये शिक्षणाला येत आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा असो किंवा सेमी इंग्रजी, यासाठी पालकांमध्येही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे गावातील जि. प. शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण प्राप्त होत असतानाही केवळ पालकांमधील स्पर्धा पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. देवगड, तळेबाजार, जामसंडे, पडेल, शिरगाव, मिठबाव यासारख्या ठिकाणी लगतच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. याची आकेडीवारी पाहता त्या-त्या गावातील पटसंख्या कमी आहे. विद्यार्थ्यांना शहरी भागात शाळेत ये-जा करण्यासाठी खास वाहनांची व्यवस्थाही करण्यात आल्याचे चित्र दिसते. एकीकडे लोकसंख्येच्या कारणामुळे पटसंख्या कमी होत आहे. त्याबरोबरच शहरी भागात शिक्षणासाठी दाखल करण्याची पालकांची संख्या वाढल्याने गावातील शाळा आता बंद पडत आहेत. पुढील वर्षात देवगड तालुक्यातील सुमारे 20 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी ग्रामस्थांनीच शासनाकडून मंजूर करून आणलेल्या शाळा आता बंद होत असताना कोणतीच उपाययोजना गावस्तरावरून होत नाही. पूर्वीप्रमाणेच ‘एक गाव एक शाळा’ ही संकल्पना पुन्हा रुजणार, हे या चित्रावरून स्पष्ट होत आहे.