|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालकमंत्र्यांवर घरावर भाजप नेणार मोर्चा

पालकमंत्र्यांवर घरावर भाजप नेणार मोर्चा 

अवैध धंदे वाढल्याने आंदोलन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडीसह जिल्हय़ात अवैध दारू, मटका धंदे वाढले आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पोलिसांवर वचक नसल्याने हे अवैध धंदे सुरू आहेत. ते बंद न केल्यास 15 ऑगस्टला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर महिलांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे. येथील विश्रामगृहावर तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक मनोज नाईक, दादू कविटकर, अमित परब उपस्थित होते.

आंबेगाव येथे अवैध दारूधंद्याविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारलेला असतानाच पोलिसांबरोबर गेलेल्या तक्रारदाराला मारहाण झाली. त्यामुळे वातावरण तापले असतांनाच भाजपचे महेश सारंग यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री केसरकर यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेचे कार्यकर्ते दारूबंदी व्हावी, यासाठी प्रयत्नशील असतांनाच त्यांच्यावर हल्ला होतो. केसरकर गृहराज्यमंत्री असतांना असा प्रकार होणे दुर्दैवी आहे. पोलिसांवर पालकमंत्री केसरकर यांचा वचक नसल्याने असे होत आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची दारूबंदीची मागणी असतांना कार्यवाही होत नसल्याने भाजपच्यावतीने पालकमंत्री केसरकर यांच्या घरावर 15 ऑगस्टला महिलांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सारंग यांनी दिला.

अवैध दारू, मटका धंदे सावंतवाडी तालुक्यासह जिल्हय़ात सुरू आहेत. भेसळ असलेल्या दारूमुळे अनेकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे धंदे बंद होणे आवश्यक आहे. यात कुणीही राजकारण न आणता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही सारंग यांनी केले.