|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वारणा पात्राबाहेर, ‘आयर्विन’ 18 फुटावर

वारणा पात्राबाहेर, ‘आयर्विन’ 18 फुटावर 

नदी पातळीत 24 तासात दुपटीने वाढ

प्रतिनिधी/ सांगली

जिह्यात काही दिवसापासून पावसाने दमदार सुरूवात केली असून जिल्हय़ातील पश्चिम भागात पावसाची धुवांधार सुरू आहे. पावसाच्या पाण्याने कृष्णा-वारणा नद्या पात्रबाहेर गेल्या आहेत. वारणा धरणाच्या पाणी साठय़ात वाढ होत असून धरणातील साठा 11.89 टीएमसी इतका झाला आहे. चांदोलीत गेल्या दिवसभर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या धुवाँधार पावसाने तीन बंधारे, तीन पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील नरसोबावाडी येथील मंदिरात पावसाचे पाणी आले आहे. त्यामुळे दक्षिणव्दार होण्याची शक्यता आहे.

 दरम्यान, जोरदार पाऊस पडत असल्याने नदीपात्राच्या पाण्यात वेगाने वाढ झाली आहे. कृष्णा नदीवर आयर्विनची पातळी 18 फुटावर गेली असून चोवीस तासात दुप्पटीने वाढ झाली आहे.

जिल्हय़ात पावसाने सुरूवात केली असून पश्चिम भागात पावसाने जोरदार पाऊस सुरू आहे. शिराळा, वाळवा, मिरज पश्चिम या भागात पावसाची धुवाँधार सुरूच आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्येही वाढ होत आहे. पूर्व भागात मात्र पावसाने दमदार सुरूवात केली नाही. मिरजपूर्व, कवठेमहांकाळ, जत, तासगाव या तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. यामुळे येथील खरीप पेरणी खोळंबली आहे. बळीराजा मोठया पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शहर परिसरामध्येही सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.

पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसामुळे वारणा-कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात वाढ होत आहे. या दोन्ही नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. वारणा नदीवरील तीन ते चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आयर्विनची पातळी चोवीस तासात दुपटीने वाढली आहे. रविवारी आठ फुट असलेली पातळी सोमवारी सकाळी 18 फुटावर गेली. पावसाचा जोर असाच राहिला तर नदी पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहे 8.6, ताकारी 21.8, भिलवडी 17.6, अंकली 21 फुट इतकी झाली आहे. सोमवारी पश्चिम भागात पावसाचा जोर कायम होता. दिवसभर पंधरा ते वीस मिमी पावसाची नोंद झाली. तर गेल्या रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठपर्यंत शिराळय़ामध्ये 28 मिमी पावसाची नोंद झाली. मिरज 4  वाळवा-इस्लामपूर 22, कवठेमहांकाळ 6, कडेगाव 22 मिमी , खानापूर-विटा 6 मिमी, तासगाव 21, सांगली 6, पलूस 7, इतका पाऊस पडला.

धरणसाठय़ातही वाढ

 जिह्यातील वारणा धरणात आज अखेर 11.89  टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. कोयना धरणामध्ये 28.97 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी. एम. सी, धोम धरणात 3.21 टी. एम. सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी. एम. सी., कण्हेर धरणात 3.55 टी. एम. सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 आहे.

अनेक पुल पाण्याखाली

 जिह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसाने पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. वारणा पात्राबाहेर तर कृष्णेच्या पातळीत दुप्पट वाढ आहे. चांदोली धरण, चरण, कोकरूड मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. मांगले-काखे, कोकरूड-रेठरे, येळापूर-समतापूर हे तीन पुल पाण्याखाली गेले आहेत. तसेच शिगाव, दुधगाव, समडोळी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतूक ठप्प आहे.