|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मंगळसूत्र चोरटा दोन तासात पोलिसांच्या जाळय़ात

मंगळसूत्र चोरटा दोन तासात पोलिसांच्या जाळय़ात 

प्रतिनिधी/ सातारा

लिंब (ता. सातारा) येथील शेरी येथे राहणाऱया वृध्द दाम्पत्यांच्या असहय़तेचा गैरफायदा घेत त्यांच्या घरात शिरुन पावणे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेणाऱया चोरटय़ास सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोन तासात या चोरीचा छडा लावत धनंजय मधुकर लोखंडे (वय 42) मूळ रा. भुईज व सध्या रा. लिंब ता. जि. सातारा याला मुद्देमालासह अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, लिंब (शेरे) ता. सातारा येथील वसंत सदाशिव शिंदे (वय 72) व त्यांची पत्नी महानंदा शिंदे असे पती-पत्नी राहत आहेत. दोघेही वृद्ध असून 5 जुलै रोजी ते त्यांचे राहत्या घरामध्ये असताना महानंदा शिंदे या आजारी असल्याने त्यांचे देखभालीमध्ये त्यांचे पती व्यस्त होते. त्यावेळी  कोणीतरी अज्ञात चोरटय़ाने त्यांचे घरातील अंदाजे पाऊणे दोन तोळय़ाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरून नेले होते. याबाबत 7 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

 यानंतर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या. डी. बी. पथकाने गावामध्ये जावून दारुचे व्यसनाधीन असलेल्या लोकांकडून गोपनियरित्या, कौशल्यपूर्वक माहिती प्राप्त करून एका संशयित इसमास ताब्यात घेतले. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्या इसमास पोलीस खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली देवून चोरून लपवून ठेवलेले 40 हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र काढून दिले. ही पोलिसांनी अवघ्या दोन तासामध्ये उघड करून चोरीस गेलेला माल व आरोपी ताब्यामध्ये घेतला.

या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशनचे डी.बी. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम, हवालदार राजु मुलाणी, दादा परिहार, पोलीस नाईक सुजीत भोसले, कॉन्स्टेबल रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांनी सहभाग घेतला.