|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण कामगारांसमोर धोक्याची घंटा

खाण कामगारांसमोर धोक्याची घंटा 

प्रतिनिधी/ सांखळी

गोव्यातील खाण विषय बराच तापला असून आता खाण कामगारांना धोक्याची घंटा ऐकू येऊ लागल्याने धास्तावलेल्या खाण कामगारांनी मंगळवारी सायंकाळी सांखळी रवींद्र भवन सभागृहात खास सभेचे आयोजन केले होते. 450 कामगार या बैठकीला उपस्थित होते.

कामगार मिग जिम्स यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या खास आमसभेत कामगार हितार्थ विविध विषयावर चर्चा झाली. यात पगार न मिळणे, कामावरून कमी करण्याची धास्ती, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कर्ज इत्यादी अनेक विषयांवर चर्चा झाली.

कंपनीने धोक्याची घंटा दिल्याने आमसभा : सिनारी

या महिन्यात कंपनीने पगार न दिल्याने आणि भविष्यात कामावरून कमी करण्याचे संकेत मिळाल्याने सेसा गोवा खाण कामगारांवर समस्यांचे पहाड कोसळल्याने खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील आठवडय़ात प्रत्येक युनिट (सेसा गोवा) कोर्डी, सोन्सी, वास्को, सावर्डे, आमोणा, सारमानस आदी ठिकाणच्या कामगारांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या महिन्यात पगार मिळाला नसल्याने तो लवकर देण्यास संबंधित कंपनीच्या सीईओला कळविण्यात आले आहे. यापुढे पगार न मिळाल्यास काय? असा प्रश्न सर्व कामगारांपुढे उभा राहिला आहे. मुलांच्या भविष्याचा प्रश्न सतावत असल्याची माहिती रमेश सिनारी यांनी दिली.

सरकारने गुंता सोडवावा : कामगार

गोव्यातील खाणबंदी प्रश्न कामगारवर्गास तसेच खाण अवलंबितांना सतावत आहे. नीट अभ्यास करून हा गुंता सोडवावा, अशी अपेक्षा कामगारवर्गाने बाळगली आहे. मुख्यमंत्री खाण परिसरातील असल्याने ते लोकांच्या समस्या जवळून जाणतात. खाण अवलंबितांचे सर्व प्रश्न त्यांना माहीत आहेत. आमच्या मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये, आमचे जीवन त्रासदायक होऊ नये याची सरकारने दखल घ्यावी, अशीही अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे. सरकारने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून खाणपट्टय़ातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

सांखळी रवींद्र भवन येथे झालेल्या या बैठकीस अनंत गवस, समीर फडते, सुरज सावंत, आत्माराम परब, दीपक परब, कालिदास गावकर, प्रितेश गावकर, सुरज नाईक, प्रसाद गावस आदींची उपस्थिती होती. स्वागत रमेश सिनारी यांनी केले. प्रास्ताविक देवानंद परब यांनी केले. सुरज सावंत यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

 

Related posts: